पुणे - राज्यातील सर्वच भागात दाेन दिवसांपासून सुरू झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे सुमारे ९० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला. सर्वाधिक नुकसान बुलढाणा जिल्ह्यात सुमारे ३४ हजार हेक्टरवर झाले असून, नाशिक व नगर जिल्ह्यांत द्राक्ष पिकांना मोठा फटका बसला आहे.
अतिवृष्टी व गारपिटीने १७ जिल्ह्यांमध्ये शेतीचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे शनिवारी व रविवारी पाऊस झाला. पूर्व विदर्भ वगळता सर्वच जिल्ह्यांत पावसाची नोंद झाली. राज्यात ३० नोव्हेंबरपर्यंत अवकाळी पाऊस सुरू राहणार असल्याने पिकांना आणखी फटका बसू शकतो. पावसामुळे हवेत गारवा आल्याने थंडी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली.
विदर्भ विदर्भात अकोला, वाशिम बुलढाणा, यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीचा फटका बसला आहे. बुलढाण्यात गारपीट झाली आहे. कपाशी, तूर आणि संत्रा पिकांचे नुकसान झाले आहे.
मराठवाडा मराठवाड्यालाही अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा बसला. विभागात एकाच रात्रीत ४०.४ मि.मी. पावसाची नोंद झाली. अतिवृष्टीने २,१४० गावांतील पिके संकटात आली आहेत.
खान्देश खान्देशातील जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील २८ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली. अहमदनगर जिल्ह्यातही अतोनात नुकसान झाले आहे. घरांची मोठी पडझड झाली आहे.
तत्काळ पंचनामे करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश मुंबई : राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसलेल्या शेतीच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश सोमवारी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. ज्या जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली, तेथील जिल्हाधिकाऱ्यांना नुकसानीचा प्राथमिक अंदाज घेऊन अहवाल तातडीने सरकारकडे पाठविण्यास सांगण्यात आले आहे. त्यानंतर नुकसानभरपाई देण्याबाबत राज्य सरकार निर्णय घेईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
म्हणून होते गारपीट! डॉ. रंजन केळकर यांची माहिती पुणे : हिवाळ्यामध्ये पाऊस, गारपीट हे नवीन नाही. या महिन्यात असे हवामान असतेच. नोव्हेंबरमध्ये काही प्रमाणात पाऊस पडत असतो. हिवाळ्यात पश्चिम व पूर्वेकडील दोन्ही वारे महाराष्ट्रावर भिडत असल्याने इथे वादळी पाऊस आणि गारपीट होते, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे माजी महासंचालक व हवामानतज्ज्ञ डॉ. रंजन केळकर यांनी ‘लोकमत’ला दिली.
जिल्हानिहाय पावसाची नोंद (मिलिमीटर) ठाणे १८ पालघर २६ नाशिक २७ धुळे २६ नंदुरबार ६२ जळगाव ३२ नगर ३१ पुणे १४ संभाजीनगर ६१ जालना ७१ बीड २७ नांदेड ३६ परभणी ६५ बुलढाणा ६० अकोला ३२ वाशिम ५० अमरावती १४ यवतमाळ २७
गुजरातमध्ये २० मृत्यूगुजरातच्या अनेक भागातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. राज्याच्या विविध भागात वीज कोसळून २० जणांचा मृत्यू झाला. दाहोदमध्ये ४, भरूचमध्ये ३, तापीमध्ये २, तर अहमदाबाद, अमरेली, बनासकांठा, बोटाद, खेडा, मेहसाणा, पंचमहल, साबरकांठा, सूरत, सुरेंद्रनगर व द्वारकामध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.