मुंबई - सातत्याने झालेले शोषण, त्यातून अनुभवलेली पीडा, कातकरी बांधवांनी केलेले अनुभव कथन ऐकून जणू सह्याद्री अतिथीगृहसुद्धा सोमवारी पाणावले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने सावकारांच्या जाचातून सोडविलेली जमिनीची मालकी १७ कातकरी कुटुंबांना परत मिळाली. या कुटुंबांना जागांचे सातबारे देण्यात आले तेव्हा त्यांचे डोळे आनंदाश्रूंनी पाणावले.
या समस्या आहेत, प्रामुख्याने पालघर, रायगड जिल्ह्यातील कातकरींच्या. अवघे २०० रुपये हाती ठेवून किंवा आठवड्यात एकदा चिकन देऊन सावकारांनी बळकावलेल्या जमिनी सोडविण्यासाठी फडणवीस यांनी २०१९ मध्ये एक समिती गठित केली होती. या कामाला गती देण्यासाठी चावडी वाचनाचे आदेशही दिले होते. त्यातून आजचा दिवस उगवला आणि मूळ मालकांना जमिनी परत मिळाल्या. आदिवासी विकास आढावा समितीचे विवेक पंडित यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले.
शासकीय खर्चाने पाट्या गेल्याच आठवड्यात सह्याद्रीवर कातकरी समाजाच्या या समस्यांवर एक व्यापक बैठक उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली होती. फडणवीस यांनी केवळ सातबारे दिले नाहीत, तर त्यांची पुढचीही व्यवस्था करून दिली. आता त्यांना जागेचा ताबा द्या, शासकीय खर्चाने त्यांच्या जागेवर मालकी पाट्या लावून द्याव्या, योग्य सीमांकन आखून द्या, असे निर्देशसुद्धा त्यांनी दिले.
संविधानाने त्यांना दिलेले अधिकार; पण त्यांना त्यापासून वंचित राहावे लागले. त्यांचे जे होते, तेच त्यांना परत केले. हा गुलामीतून मुक्त करण्याचा कार्यक्रम आहे. कातकरी समाजाच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे आहे. - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री