CM Eknath Shinde : (Marathi News) मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी बोलविण्यात आलेल्या विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील विधेयक मंगळवारी विधानसभेच्या पटलावर सादर केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "मी दिलेला शब्द पाळतो. मी शब्द फिरवत नाही. दिलेला शब्द पाळतो म्हणून माझ्यावर विश्वास ठेवतात. मी बाळासाहेबांचा, आनंद दिघेंचा कार्यकर्ता आहे. हा मनोज जरांगे यांच्या लढाईचा विजय आहे."
मराठा आरक्षणाचे विधेयक सादर करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मी मुख्यमंत्रीपदावर सगळ्यांच्या सदिच्छामुळे काम करतोय. मी कुण्या एका जाती धर्माचा, जातीचा नाही. परंतु मराठा समाजासारखं इतर कुठल्याही समाजाचे आंदोलन असते तर मी तीच भूमिका घेतली असती. जी मराठा समाजासाठी माझी भूमिका आहे तीच इतर समाजासाठीसुद्धा घेतली असती. पंतप्रधानांनी सांगितले की, सबका साथ सबका विकास याच मंत्राने राज्य सरकार काम करत आहे. एका समाजाला जर मागासलेपण आले असेल तर त्यांना मूळ सामाजिक प्रवाहात आणणं आपलं काम आहे. म्हणून मराठा समाजाला इतर कुणाच्याच आरक्षणाला धक्का न लावता शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या आरक्षण देण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगतिले.
नागपूर येथे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहाच्या सर्व सदस्यांनी मराठा समाजाला आरक्षणाची कशी गरज आहे हे तीन दिवसाच्या चर्चेत मांडलं होतं. विशेष म्हणजे सर्व सभागृहाची मराठा आरक्षणास मजबूत समंती मिळाल्याने फेब्रुवारी २०२४ मध्ये विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवून या विषयावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येईल हे मी जाहीर केले होते. तो दिवस आज अमृत पहाट घेऊन आला आहे. माझ्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि संपूर्ण मंत्रिमंडळ गेले १५० दिवस अहोरात्र मेहनत घेत आहे. प्रशासनातील, विशेषतः सामान्य प्रशासन विभाग, राज्य मागासवर्गीय आयोग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महसूल विभाग, विधी व न्याय विभाग तसेच वित्त विभागातील आणि गृह विभागातील अधिकाऱ्यांपासून ते अगदी शेवटच्या चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांनी घेतलेली अपार मेहनत आणि त्याचे फलित म्हणजे आजचे हे विधान मंडळाचे विशेष अधिवेशन आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
मी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झाली याचा मला आनंद आहे. हा निर्णय सगळ्यांचा आहे. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आपण पाहिले की, छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठा समाजाला टिकणारं आणि कुठल्याही समाजाला धक्का न लावता आरक्षण देणार असल्याची शपथ घेतली होती. मराठा समाजाने जो लढा उभारला, त्या मराठा समाजाच्या वेदनांची जाणीव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने हा आजचा दिवस ऐतिहासिक आणि इच्छापूर्तीचा आहे. महाराष्ट्र विधान मंडळाच्या वास्तूमध्ये अनेक ऐतिहासिक निर्णय झाले आहे. आजसुद्धा ही वास्तू या ऐतिहासिक दिवसाची साक्षी ठरत आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
सगळ्या महाराष्ट्राने बघितले असेल की, मला आंदोलनकर्त्यांना भेटावं लागलं. मी प्रोटोकॉल कधी पाळले नाहीत. मी लोकांमध्ये उतरुन काम केलं आहे. मी माझ्या पदाचा आब कधीच आणला नाही. काही जण म्हणतात की, जेव्हा आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतलं तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वेळ मारुन नेली. परंतु आज जो आम्ही निर्णय घेतला आहे त्याचा सगळ्यांना लाभ होईल. आम्ही शेतकरी, कामगारांच्या हिताचे निर्णय घेतले आहे. दहा वेळा विचार करुन आम्ही शब्द देतो. परंतु दिलेला शब्द मी पाळतो म्हणून लोक माझ्यावर विश्वास ठेवतात, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
आम्ही घेतलेला निर्णय म्हणजे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा विजय झाला असाच आहे. त्यांनी कधीच संयम सोडला नाही. यावेळी मराठा समाजाने उभारलेल्या आंदोलनात अनूचित प्रकार घडले. मात्र, आता सगळ्यांनी गुण्यागोविदांने राहिले पाहिजे. मराठा समाजाची एकजूट आणि चिकाटीचा हा विजय आहे. मराठा समाजाने केलेल्या आंदोलनाला एक धार प्राप्त झाली होती. त्यामुळे राज्याच्या विकासाला अडथळा निर्माण झाला असता तो राज्याला न परवडणारा आहे. काही जणांना वाटतं आताच पाहिजे, परंतु सगळ्या कायदेशीर प्रकिया पार कराव्या लागतात. त्यामुळे संयम ठेवला पाहिजे, असेही आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.