मुंबई - दिवाळी पाडव्याच्या निमित्त मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच गेल्या चार महिन्यांमध्ये सुरू केलेल्या योजनांची यादी वाचतानाच ही केवळ सुरुवात आहे, अजून मोठी मजल गाठायची आहे, असे सांगितले.
राज्यातील जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे म्हणाले की, आज दिवाळी पाडवा, पाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा. आपण दीपोत्सव साजरा करत आहोत. गेली दोन वर्षे निर्बंध होते. यावेळी मात्र निर्बंधमुक्त सण साजरे केले जात आहेत. सर्वत्र सकारात्मक बदल दिसत आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही हे पाऊल टाकलं आहे.
हे सरकार प्रत्येकाच्या मनातलं सरकार आहे, असं वाटलं पाहिजे. आमची वाटचालही तशीच सुरू आहे. आपत्तीसमोर आपण डगमगलो नाही. त्यामुळे काही योजना सुरू केल्या. त्या यशस्वी होताहेत. अंमलबजावणीत अडचणी आहेत. मात्र हेतू सुस्पष्ट निसंदेह आहे, असे ते म्हणाले.
यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सरकारने सुरू केलेल्या योजनांना मिळत असलेल्या यशाचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत एसटी प्रवास उपलब्ध करून देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला. त्याचा लाभ आतापर्यंत एक कोटी लोकांनी घेतला आहे. तसेच दिवाळीसाठी शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा उपलब्ध करून दिला आहे. आम्ही अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना एनडीआरएफच्या निकषांच्या दुप्पट मदत देण्याचा निर्णय़ घेतला. अतिवृष्टीग्रस्तांना चार हजार कोटींची मदत केली. भूविकास बँकेतील कर्ज माफ केले. नियमित कर्ज भरणाऱ्यांना प्रोत्साहनपर प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचं अनुदान सात लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
आम्ही पोलीस भरतीला सुरुवात केली आहे. २० हजार पोलीस शिपायांची पदे भरली जातील. तसेच पुढीस वर्षभरात विविध विभागातील ७५ हजार पदांची भरती प्रक्रिया सुरू केली जाईल. पोलिसांच्या घरांच्या किमती ५० लाखांवरून १५ लाखांवर आणली आहे.
प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आरोग्यासाठी दुप्पट निधी उपलब्ध करून दिला आहे. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना सुरू केली. तसेच माता सुरक्षित...अभियानात ४ कोटी महिलांची तपासणी केली आहे, असेही शिंदे यांनी सांगितले.
समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी सुरू होणार आहे. पश्चिम महाराष्ट्र ते गोवा नवा इकॉनॉमिकल कॉरिडॉर सुरू केला जाईल. मुंबईत ३३७ किमी मेट्रोचं जाळं निर्माण करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल. राज्य सरकारने केंद्रातील नीती आयोगाप्रमाणे मित्र ही संस्था सुरू केली आहे. एमएमआरमधील पायाभूत सुविधांच्या विकासाला वेग देण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मुंबईतील ६०० किमी रस्ते काँक्रिटचे काम सुरू साडे पाच हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. राज्यात १५ हजार विद्यांर्थ्यांना रोजगार निर्माण करण्यासाठी टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सशी एमओयू करण्यात आला आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धातील खेळाडूंच्या बक्षीसात पाच पटींची वाढ करण्यात आली आहे. आमच्या सरकारने कुठलंही काम थांबवलेलं नाही. वित्तीय बाबींचा आढावा घेऊन तत्काळ परवानगी दिली. कृषी, सिंचन, पर्यटन आरोग्य अशा विविध कामांना गती देतो आहोत आहोत, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, महाराष्ट्र देशाचं ग्रोथ इंजिन आहे. मुंबई आर्थिक राजधानी आहे. विदेशी गुंतवणुक आणि व्यापार, उद्योग, पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. तो देशाच्या विकासाची पताका जगात फडकवत राहील, हीच सर्वांसोबत आमची भावना आहे. यासाठीच आम्ही सर्वांनी एकजूट केली आहे. त्याला तुम्ही साथ देत आहातच, ती साथ कायम राहील, ते नातं अधिक दृढ असा विश्वास आहे. जनतेच्या मनातलं सरकार म्हणजे त्यांचे प्रश्न, अडीअचडणी समजून पुढे जाणारं सरकार अशी आमची धारणा आहे. त्यासाठी अहोरात्र काम करण्याची, जनतेत जाऊन त्यांना सोबत घेऊन पुढे जाण्याची आमची तयारी आहे. गेल्या काही दिवसांत हे बदल तुम्ही अनुभवत असालच, हा केवळ एक टप्पा आहे. अजून मोठी मजल गाठायची आहे, असे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.