-अप्पासाहेब पाटीलसोलापूर - वारकरी भाविकांना तसेच राज्यातील सर्व जनतेला पांडुरंगाच्या कृपेने सुख, समृद्धी, लाभो त्यांच्या जीवनात ऐश्वर्य व भरभराट येवो असे साकडे विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत फुलकुंडवार यांनी कार्तिकी एकादशीनिमित्त आयोजित शासकीय महापुजेच्याप्रसंगी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार व सायली पुलकुंडवर तसेच मानाचे वारकरी यांच्या हस्ते आज पार पडली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम,अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, अतिरिक्त पोलीस अधिक्षक प्रीतम यावलकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी प्रशांत जाधव आदी उपस्थित होते.
शासकीय महापूजेच्या वेळी उपस्थित राहणाऱ्या मानाच्या वारकरी निवडीसाठी दर्शन रांगेतून माळकरी भाविकांची निवड करण्यात आली. लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यातील बाबुराव बागसरी सगर व सागरबाई बाबुराव सगर या दांपत्याची मानाचे वारकरी म्हणून निवड करण्यात आलेली आहे. सगर दापत्य हे गवंडी काम करून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. हे दाम्पत्य मागील १४ वर्षापासून नियमितपणे वारी करीत आहे. या दाम्पत्याला विभागीय आयुक्त डॉ पुलकुंडवार यांच्या हस्ते राज्य परिवहन महामंडळाचा वर्षभर मोफत एसटी पास देण्यात आला. प्रारंभी मंदिर समितीच्या वतीने डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार व त्यांच्या पत्नी सायली पुलकुंडवर व मानाचे वारकरी यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मंदिर समितीची व्यवस्थापक मनोज श्रोत्री तर सूत्रसंचालन विनया कुलकर्णी यांनी केले.