भारताचा ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला. याचे औचित्य साधत 'आपला अभिमान.. संविधान' हा उपक्रम राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात आला. देशात संविधानिक मूल्यांची पायमल्ली होत आहे, असा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केला जातो. या गोष्टी रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सोशल माडियावर 'आपला अभिमान.. संविधान' हा उपक्रम राबविण्यात आला. ज्याप्रमाणे आपण स्वातंत्र्यदिनी 'हर घर तिरंगा' फडकवला, त्याचप्रमाणे प्रजासत्ताक दिनी घरोघरी संविधान पोहोचवायला हवे. संविधानाची जनजागृती, घटनेची अंमलबजावणी केल्यावरच खरे स्वातंत्र्य अनुभवायला मिळेल, असे ट्विट करत, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या उपक्रमाची माहिती दिली.
या उपक्रमाअंतर्गत पक्षाच्या सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या सर्व सोशल मिडिया माध्यमांवरील डिपीवर संविधानाचा फोटो ठेवण्याचे आवाहन पक्षाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील व माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याकडून त्यांच्या व्हॉटस्ॲप डिपीवर संविधानाचा फोटो ठेवण्यात आला असून यासोबतच स्टेटसही ठेवण्यात आला. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशात संविधानाचा होणार अपमान रोखण्यासाठी व देशात संविधान अधिक भक्कम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उपक्रम अधिक महत्वपूर्ण ठरेल, असे मत राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींनी व्यक्त केले.
मुंबई राष्ट्रवादी भवन येथे प्रजासत्ताक दिन साजरा
देशाच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई येथील राष्ट्रवादी भवन येथे पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. "आपल्या पक्षाचे नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आपल्याला जास्तीत जास्त समाजकारण व कमीत कमी राजकारण केले पाहिजे. यातूनच पक्षाला चांगली ताकद मिळते. या विचारधारेतून सर्वांनी आपल्या भागातील समाजाच्या हिताच्या आणि विकासाच्या कामात चांगल्या पद्धतीने लक्ष द्यावे. आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांना सामोरे जाताना याच समाजोपयोगी कामांमधून चांगले यश मिळेल," असा दृढविश्वास अनिल देशमुख यांनी व्यक्त केला.