'देहाकडून देवाकडे जाताना वाटेत देश लागतो आणि आपण त्या देशाचे देणे लागतो', हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे उदगार! या वक्तव्याला अनुसरून त्यांनी आजन्म कृती केली. म्हणूनच त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून पूर्वसंध्येला अर्थात २७ मे रोजी नाना साठे प्रतिष्ठानतर्फे ठाण्यातील सहयोग मंदिरात सुमेधाताई चिथडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी वगळता वर्षभरात क्वचितच आपले राष्ट्रप्रेम जागृत होते. स्वतःच्या वलयात गुर्फटलेले आपण समाजभान विसरत चाललो आहोत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुमेधा ताईंनी सैनिकी जीवनाची दाहकता समाजापुढे ठेवली आणि समर्थ रामदास स्वामी यांचा आदर्श बाळगून पावन भिक्षा मागितली. त्यावेळेस ठाणेकरांनी मुक्त हस्ताने अर्थसहाय्य करून त्यांच्या उपक्रमास हातभार लावला.
सुमेधाताई चिथडे या सैनिकपत्नी आणि सैनिक माता असल्यामुळे त्यांनी सैनिकी जीवन फार जवळून अनुभवले आहे. आपल्या जवानांसाठी आपण काहीतरी खारीचा वाटा उचलावा अशी इच्छा बाळगून त्यांनी तब्ब्ल अडीच कोटी रुपयांचा 'ऑक्सिजन जनरेशन प्लांट' सियाचेन येथे उभा केला. हा प्रकल्प जननिधीतून उभा राहिला, हे त्या विनम्रपणे सांगतात. त्यांच्या कार्याची दखल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील घेतली आहे. हे कार्य अविरत सुरु राहावे आणि समाजाला राष्ट्रकार्यार्थ प्रेरित करावे म्हणून त्या व्याख्यानाच्या माध्यमातून ठिकठिकाणी जातात. लोकांनी स्वेच्छेने दिलेला निधी प्रकल्पास जोडतात आणि जनजागृती करतात.
नाना साठे प्रतिष्ठान देखील समाजकार्यासाठी वाहून घेतलेली संस्था आहे. त्याचे संस्थापक कौस्तुभ साठे सांगतात, 'या प्रतिष्ठानातर्फे कॅन्सर रुग्णांना मदत, भारतीय सैनिकांना फराळ भेट, ग्रामीण विद्यार्थ्यांना शैक्षणिक, अत्यावश्यक साहित्य वाटप, वृद्धाश्रम, अनाथाश्रम, बालिकाश्रमांना मदत, कर्णबधिर मुलांच्या शिक्षणासाठी मदत, पंढरपूर वारीत अन्नदान दैत्य उपक्रम राबवले जातात.' संस्थेतर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमाला अनपेक्षित प्रतिसाद मिळाल्याने आपण भारावून गेलो असे ते सांगतात.
या कार्यक्रमासाठी मेजर सचिन ओक, मेजर प्रांजल जाधव, अर्जुन पुरस्कार विजेती टेबल टेनिस खेळाडू मधुरिका पाटकर, शेफ निलेश लिमये, वीरपत्नी सुनीता राजगुरू, एसीपी मंदार धर्माधिकारी आणि आदी मान्यवर उपस्थित होते.