मुंबई - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ९ राज्यांचे राज्यपाल आणि पुद्दुचेरीचे उपराज्यपाल यांची नियुक्ती केली आहे. त्यात महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना राजस्थानचं राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. राज्यातील भाजपाचे दिग्गज आणि निष्ठावंत नेते म्हणून त्यांनी ओळख आहे. आरएसएस ते भाजपा आणि आता राज्यपाल असा त्यांचा राजकीय प्रवास झाला आहे.
हरिभाऊ बागडे यांचा जन्म १७ ऑगस्ट १९४५ मध्ये महाराष्ट्राच्या औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) जिल्ह्यात झाला. याठिकाणच्या फुलंब्री शहरातील एका मराठा कुटुंबात जन्मलेले हरिभाऊ राज्यातील महत्त्वाचे नेते बनले. त्यांचे शिक्षण सरस्वती भवन शाळेत झालं. दहावीपर्यंत त्यांनी शिक्षण घेतले आहे. वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सहभागी झाले होते. त्यानंतर १९८५ मध्ये औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून ते भाजपाच्या तिकिटावर निवडून आले.
फुलंब्री विधानसभेचे ५ टर्म आमदार राहिले आहेत. त्याठिकाणी हरिभाऊ बागडे 'नाना' नावाने ओळखले जातात. हरिभाऊंचं बालपण हे अत्यंत गरिबीत गेले. त्यांचे वडील शेतकरी होते. कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी हरिभाऊ बागडे यांनी अनेक वर्ष फुलंब्री शहरात घरोघरी जात वृत्तपत्र विकण्याचं कामही केले. शेती आणि शेतकरी हे त्यांच्या आयुष्याशी निगडीत असल्याने त्यांनी घराचे नाव कृषी योग ठेवलं.
भाजपा सरकार येताच बनले विधानसभा अध्यक्ष
हरिभाऊ बागडे फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून सतत निवडून येत होते. २०१४ साली त्यांनी काँग्रेसच्या कल्याण काळेंचा पराभव केला. राज्यात २०१४ साली भाजपाचं सरकार आलं तेव्हा विधानसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी हरिभाऊ बागडे यांच्यावर सोपवण्यात आली. युती सरकारमध्ये ते माजी कॅबिनेट मंत्रीही राहिले आहेत. १९९५ ते १९९९ या युती सरकारच्या काळात त्यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाची जबाबदारी होती. २००३ आणि २००९ साली हरिभाऊ बागडेंना फुलंब्री मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागला होता. १९८५ ते २०२४ या ४० वर्षाच्या काळात बागडे भाजपाशी एकनिष्ठ राहिले. त्यामुळे आता त्यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.