ऑनलाइन लोकमतसांगली, दि. 18 : मतिमंद मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अंत्राळ (ता. जत) येथील धनाजी विठोबा शिंदे यास दोषी धरून आठ वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. जिल्हा व सत्रन्यायाधीश सौ. एस. एस. सापटणेकर यांनी गुरुवारी हा निकाल दिला.
पीडित मुलगी कुटुंबासोबत अंत्राळ येथे शेतात राहत होती. आरोपी शिंदे याची तिच्या कुटुंबाशी चांगली ओळख होती. ४ आॅगस्ट २००९ रोजी शिंदे या मुलीच्या शेतात गेला होता. मुलीची आजी व आई शेतात काम करीत होत्या. मुलगी घरात होती. शिंदे याने आजीशी गप्पा मारल्या. त्यानंतर पाणी पिण्याचा बहाणा करून तो त्यांच्या घरी गेला. मुलगी घरी एकटीच असल्याचे पाहून त्याने तिच्यावर बलात्कार केला. शिंदे बराचवेळ न आल्याने आजी त्याला पाहण्यासाठी घरी गेली, त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला होता. आजीला पाहून शिंदे पळून गेला होता.
शिंदेविरुद्ध जत पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. सहाय्यक जिल्हा सरकारी वकील सौ. आरती देशपांडे-साटविलकर यांनी खटल्याचे कामकाज पाहिले. त्यांनी सरकारतर्फे सहा साक्षीदार तपासले. यामध्ये मुलीची आजी, वैद्यकीय अधिकारी, तपास अधिकारी पोलिस निरीक्षक एस. बी. बोडसे यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. न्यायालयाने बुधवारी शिंदेला दोषी ठरविले होते. शुक्रवारी त्यास आठ वर्षे सक्तमजुरी, दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा ठोठावली.