अतुल कुलकर्णी मुंबई : म्युकरमायकोसिस आजाराचे महाराष्ट्रात दीड हजार रुग्ण आहेत. हा आजार वेळीच लक्षात आला आणि त्यावर तातडीने उपचार झाले तर तो बरा होतो. मधुमेहाच्या रुग्णांनी कोरोनातून बरे झाल्यानंतर, स्वतःच्या शरीरातील साखर वाढू दिली नाही तर हा आजार होत नाही, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक प्रख्यात नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी ‘लोकमत’ला दिली. लक्षणे दिसू लागताच जर रुग्ण डॉक्टरांकडे गेला तर तो नुसत्या औषधांनी बरा होऊ शकतो. त्रास वाढू लागला तर औषध व ऑपरेशन या दोन्हीच्या साहाय्याने या रुग्ण वाचू शकतो. हा आजार संसर्गजन्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. डॉ. लहाने म्हणाले, आयसीयूमध्ये ऑक्सिजन देण्यास जे पाणी वापरले जाते ते डिस्टिल्ड वॉटर असले पाहिजे. त्याशिवाय नाकामध्ये बिटाडीन टाकणे, स्टेरॉइडचा कमीत कमी वापर करणे या गोष्टी बारकाईने केल्या पाहिजेत. रुग्ण कोरोनामधून बरा झाल्यावर तीन ते चार आठवड्यांनी हा आजार होण्याचे प्रमाण समोर येत आहे. रेमडेसिविर व स्टेरॉईडचा वापर याचे साइड इफेक्ट रुग्णांवर होत असतात. आजार लपवू नका. टास्क फोर्सच्या सदस्यांशी रविवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे संवाद साधणार आहेत.
मधुमेहाच्या रुग्णांनी कोरोनातून बरे झाल्यावर स्वतःची साखर नियंत्रणात ठेवली तर हा आजार होण्याची शक्यता मावळते. हा आजार अंगावर काढू नका. - डॉ. तात्याराव लहाने, वैद्यकीय शिक्षण संचालक
स्टेरॉईडचा अतिवापर नकोरुग्णांना ९ दिवसांपेक्षा जास्त काळ स्टेरॉईड दिले असेल आणि रुग्ण मधुमेही असेल तर त्यांना हा काळ्या बुरशीचा आजार दिसत आहे. स्टेरॉईडबद्दल डॉक्टरांच्या मनात आस्था असते. कारण ते मृत्यूच्या दारातल्या रुग्णाला परत आणू शकते. पण चांगल्या रुग्णाला मृत्यूच्या दारात नेऊ शकते हे लक्षात घेऊन स्टेरॉइडचा वापर अतिशय काळजीपूर्वक केला पाहिजे. - डॉ. संजय ओक, टास्क फोर्सचे प्रमुख
कोरोना रुग्णांवर स्टेरॉईडचा भडिमार झाल्यास त्याच्या अतिवापराने म्युकरमायकोसिस आजार होऊ शकतो. या कालावधीत रुग्णाच्या शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते. कोरोनामधून बरे झाल्यानंतर रोज कोमट पाण्याने गुळण्या करा. तोंड, नाक साफ ठेवा. ‘ओरल हायजिन’कडे लक्ष द्या. - डॉ. शशांक जोशी, सदस्य टास्क फोर्स, ज्येष्ठ मधुमेह तज्ज्ञ