पनवेल : खारघर सेक्टर ७ येथील डेल्ली बेल्ली या उघड्यावरील खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या स्टॉलवरील पदार्थ खाल्याने २० पेक्षा जास्त जणांना अन्नातून विषबाधा झाल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी शनिवारी सायंकाळी खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. खाद्यपदार्थातून विषबाधा झालेले रु ग्ण खारघरमधील विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. रविवारी पनवेल महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी भेट घेऊन त्याच्यावर सुरु असलेल्या उपचाराची माहिती घेतली. याप्रकरणी खारघर पोलिसांनी गुन्हा दाखल करून एकाला अटक देखील केली आहे. रफीक रईस शेख असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. खारघरमधील निरामय, श्री, संजीवनी या रु ग्णालयांत पाच ते सात जण असजूनही उपचार घेत आहेत. यामध्ये सुमारे ३ वर्षांपेक्षा कमी वयाच्या एका मुलाचाही समावेश असल्याचे या पाहणीत आयुक्तांच्या निदर्शनास आले. निरामय याठिकाणी दीपांजली कुश (२२) या निफ्ट कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीलादेखील शोरमा खाल्याने त्रास झाला. आयुक्तांनी यासंबंधी कुशला विचार करून प्रकृतीची माहिती घेतली. संपूर्ण घटनेत एकही जणांनी खारघर पोलीस ठाण्यात तक्रार केली नव्हती. पोलिसांनी सतर्कता दाखवत गुन्हा नोंदवून आरोपीना अटक केली. >खारघर येथील खाद्यपदार्थातून अनेकांना विषबाधा झाली, मात्र तक्रार करण्यासाठी कोणी पुढे आले नाही. शोरमा बनविणाऱ्या कर्मचाऱ्याला अटक केली असून लवकरच मालक खानलाही अटक करू.- दिलीप काळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक
विषबाधाप्रकरणी एकाला अटक
By admin | Published: February 27, 2017 2:06 AM