बारामती - शहरातील २ अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराची दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज सकाळी बारामतीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत महिला सुरक्षेसाठी शहरात शक्ती अभियान राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिलांचा सन्मान, बालकांची सुरक्षा आणि युवकांचे प्रबोधन हे अभियानातून करण्यात येणार आहे अशी माहिती अजित पवारांनी दिली.
अजित पवार म्हणाले की, बारामती शहराला काळीमा फासणारी जी घटना घडली ती दुर्दैवी आहे. अलीकडच्या काळात जन्माला आलेली मुले इतके स्मार्ट आहेत, मुलं प्रश्न विचारतात. अल्पवयीन मुलांच्या वयाची मर्यादा १४ पासून करता येईल का याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. हा कायदा करताना केंद्राला सांगावं लागेल. मी दिल्लीला गेल्यानंतर नक्की याविषयी बोलणार आहे. मुख्यमंत्र्यांचीही चर्चा करणार आहे. अलीकडच्या काळात अल्पवयीन मुले गुन्ह्यात अडकत आहे. त्याविषयी निर्णय करण्याचा विचार आम्ही करू असं अजित पवारांनी सांगितले. यावेळी अजित पवारांनी बारामती शहरात सुरक्षेच्या दृष्टीने पंचशक्ती अभियानाची घोषणा केली. नेमकं कसं असेल हे अभियान जाणून घेऊया.
शक्ती बॉक्स तक्रार पेटी
मुलींचा पाठलाग करणे, त्यांना मेसेज पाठवणे, कधीकधी दुसऱ्यांच्या फोनवरून संपर्क साधणे, मनमोकळेपणाने मुलींना या गोष्टी सांगता येत नाही. ज्या मुली तक्रार करण्यासाठी घाबरतात त्यांच्यासाठी शहरातील सर्व परिसरात शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, एसटी स्टँड, पोस्ट ऑफिस, महिला वसतीगृह इथं शक्ती बॉक्स तक्रार पेटी लावण्यात येईल. या तक्रार पेटीत गोपनीय तक्रारीही देता येईल, २-३ दिवसांत हा बॉक्स उघडून त्यावर पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल. संबंधितांचे नाव गोपनीय ठेवण्याची दक्षता घेतली जाईल. शहरातील कायदा सुव्यवस्था राखणे गरजेचे आहे. त्यासाठी नागरिकांनीही सहकार्य केले पाहिजे.
शक्ती हेल्पलाईन - एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह - 9209394917
बारामती शहरातील कायदा सुव्यवस्था आणि सुरक्षा ठेवण्यासाठी ही कॉल सेवा २४ तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर फोन अथवा मेसेज करून तक्रार केल्यास तात्काळ कारवाई केली जाईल. शाळा, कॉलेज, सरकारी, खासगी संस्था, कंपनी, हॉस्पिटल येथे दर्शनी भागात हे नंबर लावले जातील. अवैध धंदे, महिला छेडछाड याबाबत तक्रार आणि लोकेशन शेअर करून पोलिसांकडून कारवाई केली जाईल.
शक्ती कक्ष
बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आणि प्रत्येक पोलीस स्टेशनला शक्ती कक्ष उभारण्यात येईल. त्यात २ महिला पोलीस अंमलदार यांची नेमणूक करण्यात येईल. महिला, मुली आणि बालके यांना भयमुक्त वातावरण तयार करणे, अन्याय सहन न करता निर्भयपणे पुढे येणे, महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन करणे अशी कामे केली जातील.
शक्ती नजर
सोशल मीडियात व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्रामवर अल्पवयीन मुले किंवा इतर व्यक्ती धारदार शस्त्रे, बंदूक, चाकू घेऊन फोटो, व्हिडिओ स्टेटस ठेवतात. त्यावर शक्ती नजर असणार आहे. असे प्रकार आढळून आल्यास तात्काळ कारवाई केली जाईल.
शक्ती भेट
शहरातील शाळा, कॉलेज, सरकारी आणि खासगी कार्यालये, हॉस्पिटल, एसटी स्टँड, महिला वसतीगृह याठिकाणी भेटी देऊन तिथल्या मुलींना महिला विषयक कायदे, गुड टच बॅड टच, व्यसनाधीन मुले, लैंगिक छळ आणि मानसिक तक्रारीची दखल घेत त्यांच्यात जागरुकता आणणे, प्रबोधनात्मक कायदे विषयक महिलांसाठी व्याख्याने, युवाशक्तीला व्यसने आणि गुन्हेगारी यातून प्रवृत्त करणे, संवेदनशील ठिकाणी वारंवार पेट्रोलिंग करून महिला, मुलींवर होणाऱ्या अत्याचारास आळा घातला जाईल अशाप्रकारे अभियानाची पंचशक्ती राबवली जाणार आहे अशी माहिती अजित पवारांनी दिली.