मुंबई : आखाती देशातून चोरट्या मार्गाने भारतात सोने घेऊन येणाऱ्या तीन जणांना गेल्या दोन दिवसांत मुंबई विमानतळावर सुरक्षारक्षकांनी अटक केली आहे. या आरोपींकडून अधिकाऱ्यांनी तब्बल १ कोटी रुपयांचे सोेने जप्त केले असून यामधील दोन आरोपी श्रीलंकेचे नागरिक आहेत.गेल्या काही महिन्यांपासून आखाती देशातून होणारी सोन्याची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे विमानतळ परिसरात प्रवाशांची चोख झडती घेतली जात आहे. अशाच प्रकारे शनिवारी सायंकाळी जमीर वाहिद (४२)आणि अल्ताफ हमीद (४८) हे दोन श्रीलंकन प्रवाशी दुबई येथून मुंबई विमानतळावर दाखल झाले होते. विमानतळावरील अधिकाऱ्यांना या दोन्ही प्रवाशांवर संशय आल्याने त्यांनी तत्काळ त्यांना बाजूला घेत त्यांची झडती घेतली. तेव्हा जमीर वाहिद या प्रवाशाकडून ४५ लाख ४८ हजारांचे सोने हस्तगत करण्यात आले. तर अल्ताफ हमीद या प्रवाशांकडून ४१ लाख ९७ हजारांचे सोने पकडले आहे. अशाच प्रकारे कर्नाटक येथील सय्यद नुऊल्लामीन (२६) हा प्रवाशी दुबई येथून भारतात परतला होता. या प्रवाशाच्या सामानावर देखील संशय आल्याने अधिकाऱ्यांनी त्याच्या सामानाची झडती घेतली असता, त्याच्याजवळ असलेल्या एका ज्युसर मशीनमध्ये अधिकाऱ्यांना ५६७ ग्रॅमचे दोन सोन्याचे रॉड आढळून आले. या रॉडची किंमत १७ लाख रुपये इतकी आहे. या तिनही प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
विमानतळावरील कारवायांत एक कोटींचे सोने जप्त
By admin | Published: April 17, 2017 3:23 AM