नाशिक : नोटाबंदीच्या घोषणेनंतरही जुन्या चलनातील नोटा कमिशनवर बदलून देण्याचे प्रकार सुरूच आहेत़ मुंबई-आग्रा महामार्गावर चार महिन्यांपूर्वी चलनातील १ कोटी ३५ लाख रुपयांच्या बनावट नोटा पकडल्याची घटना ताजी असताना सोमवारी मुंबई नाका पोलिसांनी द्वारका परिसरात सापळा रचून पाच संशयितांकडून जुन्या चलनातील एक कोटी रुपयांच्या नोटा जप्त केल्या.पोलिसांनी पकडलेल्या पाच संशयितांमध्ये चार सराफ व्यावसायिकांचा समावेश असून, २५ टक्के कमिशनच्या बदल्यात त्यांना नोटा बदलून देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते़ मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश हिरे यांना द्वारका परिसरात जुन्या नोटा बदली करून देण्याचा व्यवहार होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती़ सकाळी दहा वाजेपासून तेथे साध्या वेशात पोलिसांचा सापळा लावण्यात आला होता़ दुपारी बारा वाजेच्या सुमारास एक कार द्वारका सर्कलजवळ येऊन थांबली तर विरुद्ध दिशेने दुचाकीवरून प्रमुख संशयित कृष्णा हनुमंत होळकर (ता. राहुरी, जि. अहमदनगर) हा कारजवळ येऊन थांबला़कारमधील संशयित सागर सुभाष कुलथे, योगेश रवींद्र नागरे (दोन्ही, रा. नाशिक), मिलिंद नारायण कुलथे, शिवाजी दिगंबर मैंद (दोन्ही रा. संगमनेर, जि. अहमदनगर) व दुचाकीवरील कृष्णा होळकर यांच्यामध्ये बोलणी सुरू असताना तेथे साध्या वेशात असलेल्या पोलिसांना संशय आला़ एक पोलीस वाहन त्यांच्या दिशेने येत असल्याचे पाहून त्यांनी पलायनाचा प्रयत्न केला़ मात्र, चारही बाजूने पोलिसांनी वेढल्याने त्यांना पळून जाणे शक्य झाले नाही व ते पोलिसांच्या तावडीत सापडले़पाचही संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून जुन्या चलनातील ९९ लाख ९५ हजार रुपयांच्या (पाचशे व एक हजार) नोटा, कार व दुचाकी पोलिसांनी जप्त केली़ प्राप्तीकर विभागासही माहिती देण्यात आली. (प्रतिनिधी)प्राप्तीकर विभागातील अधिकारी संशयिताची मालमत्ता, व्यवसाय, भरलेला कर याबाबत तपास करणार आहेत़ सद्यस्थितीत या पाचही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे़- लक्ष्मीकांत पाटील, पोलीस उपआयुक्त, नाशिक
नाशिकमध्ये एक कोटीच्या जुन्या नोटा जप्त
By admin | Published: April 11, 2017 1:08 AM