मुंबई : मतमोजणीच्या पहाटे वरळी परिसरातून एका चौकडीकडून तब्बल १ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी चार एजंटना वरळी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यामागे कुणा राजकीय नेत्याचा हात आहे का, या दिशेने वरळी पोलिसांचा तपास सुरू आहे. गुरुवारी पहाटे पैशांची देवाणघेवाण होणार असल्याची माहिती वरळी पोलिसांना मिळाली. वरळी येथील गांधीनगर जंक्शननजीक हा व्यवहार होणार असल्याचे समजताच परिमंडळ ३चे पोलीस उपआयुक्त प्रवीण पडवळ यांनी पथक तयार केले. या पथकाने संशयावरून तेथे आलेल्या चौघांना पोलिसांनी हटकले. त्यांची झडती घेतली असता एका प्लास्टिकच्या पिशवित तब्बल १ कोटी ४ लाख ७४ हजार ५०० रुपयांची रोकड आढळली. यात जुन्या नोटांचा समावेश होता. नितीन सुखराज राठोड, चेतन रामजी गडा, वैभव गवस आणि सुभाष गावडे अशी अटक आरोपींची नावे आहेत. चौकशीत हे चौघे नोटा बदलण्यासाठी तेथे आले असल्याची माहिती समोर आली. मात्र ते कोणाकडून हे पैसे बदलून घेणार होते आणि हे पैसे कोणाचे आहेत? याचा तपास पोलीस घेत आहेत. (प्रतिनिधी)
एक कोटींच्या जुन्या नोटा मतमोजणी दिवशी ताब्यात
By admin | Published: February 25, 2017 5:01 AM