राजुरी : उंचखडक या गावामध्ये पाण्याचा टँकर आठवड्यातून एकच दिवस येत असल्यामुळे येथील ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल होत आहे, तरी प्रशासनाने पाण्याचा टँकर दररोज चालू करावा, अशी मागणी सरपंच दत्तात्रय कणसे यांनी सर्व ग्रामस्थांच्या वतीने केली आहे.उंचखडक (ता. जुन्नर ) हे गाव नावाप्रमाणेच खडकावर वसलेले आहे. या गावामध्ये उंचखडक व आणावेत मळा अशा दोन वस्त्या आहेत. गावची लोकसंख्या सुमारे अडीच ते तीन हजारांच्या आसपास आहे. गावामध्ये पावसाचे प्रमाण अतिशय कमी आहे. त्यामुळे हे गाव तालुक्यात दुष्काळी गाव ठरलेले आहे. गावात पाण्याची अवस्था अतिशय भयानक स्वरूपाची आहे. या गावातील ग्रामस्थांचे पाणी मिळविण्यासाठी हाल होत आहे. गावात शासनाने पाण्याचा टँकर सुरू केला आहे. परंतु, शासनाने सुरू केलेला पाण्याचा टँकर आठवड्यातून एकदा येत आहे. मोठी लोकसंख्या असलेल्या गावाला एक पाण्याचा टँकर कसा पुरेल, असा प्रश्न येथील ग्रामस्थांना पडला आहे. (वार्ताहर)
उंचखडक गावात एकच दिवस टँकरने पाणी
By admin | Published: April 28, 2016 2:18 AM