मुंबई, दि. 29 - भायखळा जेलमधील कैदी मंजुळा शेट्ये मृत्यूप्रकरणी जे.जे. हॉस्पिटलमधील एका डॉक्टरवर राज्य शासनाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मुंजळा शेट्येच्या मृत्यूप्रकरणी चुकीची माहिती दिल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे. मंजुळा शेट्ये यांच्या मृतदेहावर जखमा नव्हत्या असा पहिला खोटा अहवाल देणा-या जे. जे. हॉस्पिटलमधील डॉक्टरची चौकशी करण्यात येईल, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली.
मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी मंजुळा शेट्ये यांच्या मृतदेहावर कोणत्याही जखमा नव्हत्या, असा खोटा अहवाल जे जे. रुग्णालयातील कॅज्युलिटी विभागाच्या डॉक्टरने दिला होता, त्याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली. ती गृहराज्यमंत्र्यांनी मान्य केली. यानंतर शनिवारी मंजुळा शेट्ये मृत्यूप्रकरणी जे.जे. हॉस्पिटलमधील एका डॉक्टरवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे.
One Doctor of JJ Hospital has been suspended by Maharashtra Govt for giving wrong information on Byculla jail inmate Manjula Shetye's death
— ANI (@ANI_news) July 29, 2017
विधानसभेत काय म्हणाले होते गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील ?भायखळा येथील ऑर्थर रोड कारागृहामधील महिला शिक्षाबंदी मंजुळा शेट्ये मृत्युप्रकरणी, खोटा अहवाल देणा-या आकस्मिकता (कॅज्युलिटी) वैद्यकीय अधिका-याने कर्तव्यात कुचराई केली असेल, तर चौकशी केली जाईल, तसेच न्यायालयात खोटे प्रतिज्ञापत्र सादर करणा-या वैद्यकीय अधिका-याला निलंबित करण्यात येईल, अशी माहिती विधानसभेत गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी शुक्रवारी दिली होती.
प्राथमिक अहवालानुसार, या प्रकरणी महिला तुरुंगाधिकारी, अधीक्षक, तसेच पाच महिला शिपाई यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. मंजुळा शेट्ये मृत्युप्रकरणी सगळी चौकशी पारदर्शक पद्धतीने होईल, यामध्ये कोणाही दोषीला पाठीशी घालणार नाही. या प्रकरणी राज्य महिला आयोगामार्फत सेवानिवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली निवृत्त पोलीस अधिकारी व सामाजिक कार्यकर्ता असे सदस्य असणारी चौकशी समिती गठित करण्यात आली असून, समितीमार्फत चौकशी करण्यात येणार आहे.