ठाणे-
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी वरळीतील पोलीस वसाहतीतील बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यानंतर ठाण्यातील टेंभीनाका नवरात्रौत्सव मंडळाच्या मंडपाच्या पूजेला उपस्थिती लावली. यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिलं. फोटो काढायला लोकांच्या जवळ जायला लागतं. लोक मला आपुलकीनं बोलवत असतात त्यामुळे त्यांना नाकारता येत नाही, असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोल लगावला.
राज्याचे मुख्यमंत्री सध्या लोकांसोबत फोटो काढण्यात आणि गणेश मंडळांना भेटी देण्यात व्यस्त आहेत. राज्याच्या कारभार ठप्प पडला आहे, अशी टीका विरोधकांकडून शिंदे सरकारवर केली जात आहे. याबाबत शिंदे यांना विचारण्यात आलं असता त्यांनी विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. "मी गणेश मंडळांना भेटी द्यायला आणि फिरायला लागल्यामुळेच आज इतर सगळे फिरत आहेत. माझ्यामुळेच त्यांना पुण्य लाभत असेल तर ते त्यांनी घ्यावं. आपल्याला आपुलकीनं माणसं बोलवत असतात त्यांना नाकारता येत नाही. शेवटी मी नागरिकांना त्यांच्यातला माणूस वाटतो म्हणून ते माझ्याजवळ येऊन फोटो काढण्याची इच्छा व्यक्त करत असतात. त्यांच्या कार्यक्रमांना बोलवत असतात. लोकांमध्ये राहणारा मी माणूस आहे. त्यामुळे गणेश मंडळांना भेटी दिल्या. आता इतरही लोक फिरू लागलेत. गणेश मंडळांना भेटी देत असलो तरी राज्याच्या कारभार देखील उत्तम सुरू आहे. कालच मंत्रालयात मी बैठकाही घेतल्या", असं एकनाथ शिंदे म्हणाले.
राज्याला दोन मुख्यमंत्र्यांची गरज असल्याच्या सुप्रिया सुळे यांच्या टिकेलाही शिंदे यांनी उत्तर दिलं. "आता आधी सरकार कुणाचं होतं आणि कोण चालवत होतं, हेही आपल्याला माहित आहे. नियंत्रण सुटल्यामुळे आता आमच्यावर टीका केली जात आहे. आमच्या सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आशीर्वाद आहे. यापुढे होणारे सगळे उत्सव हे निर्बंधमुक्त असतील", अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.
त्यांना सद्बुद्धी मिळो"मुंबई असो पुणे असो सर्व ठिकाणी उत्सवाचा जोरदार उत्साह आहे. पावसातही लोकांचा उत्साह दुणावलेला आहे. पुण्यात नागरिकांचं स्वागत स्वीकारण्यासाठी मी लोकांमध्ये गेलो तर फोटो काढण्यासाठी गेले अशी टीका झाली. पण फोटो काढण्यासाठीपण लोकं जवळ यायला लागतात ना", असा टोला शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता लगावला. प्रेमाने लोकांना जवळ घ्यावंही लागतं, कुणीही कुणाच्या बाजूला फोटो काढण्यासाठी जात नाही, असंही ते पुढे म्हणाले. आम्हाला टीका करायची नाही, आम्ही कामातून उत्तर देऊ असेही त्यांनी सांगितले आहे.