खालापूर/ मोहोपाडा/ लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघातांचे सत्र अद्यापही सुरूच आहे. रविवारी सायंकाळी महामार्गावरील रिस गावाच्या हद्दीत झालेल्या अपघातात एक जागीच ठार, तर पाच जण गंभीर जखमी झाले. तसेच खंडाळा एक्झिट येथे एक सिमेंटचा ट्रँकर उलटून महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.रिस गावाच्याजवळ पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या मारुती इको कारचा टायर फुटल्याने मागून येणाऱ्या स्विफ्ट व इंडिका कार इकोवर आदळून हा अपघात झाला. यात राजेश बागडे (३२) हे जागीच ठार झाले, तर हार्दिक निमले (२५), सरिता मोतीराम घस्ती (२७, रा. मीरा रोड), मोतीराम पुनाराम घस्ती (रा. मीरा रोड), शिरीन शेख (१५), रु बिना शेख (३५, रा. शिवाजीनगर) हे पाच जण गंभीर जखमी झाले. त्यांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच हर्ष घस्ती (७, रा. मीरा रोड), ओम शिव (३५, वाहनचालक), मुंबईतील गोरेगाव येथे राहाणारे दिलीप पालगडकर (७२), सलोनी पालगडकर (१५), आर्यन पालगडकर (८), अमर पालगडकर (४२) हे किरकोळ जखमी झाले.रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा सिमेंटचा टँकर खंडाळा एक्झिट येथील वळण असलेल्या उतारावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या मधोमध उलटला. त्यामुळे दुतर्फा सुमारे आठ ते दहा किमी अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सायंकाळी सात वाजता टँकर दोन क्रेनच्या साहाय्याने बाजूला ओढत आधी मुंबईकडे जाणारी तर साडेसात वाजता पुण्याकडे जाणारी लेन सुरू करण्यात आली. (लोकमत न्यूज नेटवर्क)>४ दिवसांत ९६७ वाहनांवर कारवाईपुणे : द्रुतगती महामार्गावर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ९६७ वाहनांवर प्रादेशिक परिवहन आणि महामार्ग पोलिसांनी कारवाई करून चार दिवसांत ६ लाख ९९ हजार ३७० रुपयांचा दंड वसूल केला आहे. या महामार्गावर नुकतेच पनवेलजवळ झालेल्या अपघातात १७ जणांचा मृत्यू झाला होता़ त्याअगोदर उद्योगपती डी़ एस़ कुलकर्णी यांच्या मोटारीलाही अपघात झाला होता. त्यामुळे या महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून परिवहन मंत्री दिवाकर रावते, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारीच या मार्गाची पाहणी केली. तसेच तपासणी पथकांनाही कडक कारवाईचे आदेश दिले होते.>वऱ्हाडी टेम्पोला उलटून २४ जखमीजाफराबाद (जि. जालना) : तालुक्यातील काळेगाव येथील लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या टेम्पोला अपघात होऊन २४ जण जखमी झाले. ही घटना पिंपळखुटा गावाजवळ रविवारी दुपारी घडली. पाच जणांची प्रकृती गंभीर असून, त्यात लहान मुलांची संख्या अधिक आहे. काळेगाव येथील साहेबराव लक्ष्मण जाधव यांच्या मुलीच्या विवाहासाठी वऱ्हाडी घेऊन हा टेम्पो शेलगाव अटोळ (ता.चिखली जि.बुलढाणा) येथे निघाला होता. वाळूच्या डंपरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात टेम्पो उलटला. जखमींना जालना येथील सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी पाच गंभीर जखमी झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल चव्हाण, डॉ. पांडुरंग टेकाळे यांनी सांगितले. (वार्ताहर)
द्रुतगती महामार्गावरील अपघातात एक ठार
By admin | Published: June 13, 2016 4:49 AM