लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : एकही कुणबी नोंद रद्द केली, तर २८८ उमेदवार पाडले म्हणून समजा. छगन भुजबळांचे ऐकून काम करू नका. मराठ्यांची लेकरे अधिकारी झालेले तुम्हाला पाहवत नाही का? असा खडा सवाल उपस्थित करीत मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला आव्हान दिले.
मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीचे मंगळवारी लातुरात आगमन झाले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपस्थित हजारोंच्या जनसमुदायासमोर जरांगे पाटील म्हणाले, सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करा, त्यातून कोणी राहिलेच तर त्यांनाही आरक्षण द्या, अशी आमची मागणी आहे. ज्यांच्या नोंदी सापडल्या, त्यांना अर्थात मागेल त्यास प्रमाणपत्र द्यावे. सरकारने तसे आश्वासन दिले आहे.
इथून पुढे मराठा लेकरांच्या विरोधात जो कोणी नेता जाईल, त्यांचा निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम केला जाईल, असा इशाराही जरांगे-पाटील यांनी दिला.
बीडची रॅली शांततेत होणारच
बीडच्या पालकमंत्र्यांनी बीडला रॅली होणार नाही, असा घाट घातला. सभेला परवानगी मिळू दिली नाही. हा जातीयवाद नाही का? २० वर्षापासून भुजबळ यांनी जातीयवाद वाढविला. आज मराठे एकत्र आले, तर जातीयवाद कसा काय वाटतो. गावागावात सर्व जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात. मराठा आंदोलनाला सर्व समाजाचा पाठिंबा आहे, असेही जरांगे-पाटील म्हणाले.