नामदेव मोरे, नवी मुंबईपालिकेमधील १ लाख कोटी रूपयांचा घोटाळा लपविण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीचा डाव असे संदेश सोशल मीडियामधून पसरविले जात आहेत. वास्तविक यात तथ्य नसून नवी मुंबईची बदनामी करण्याचा डाव आहे. पालिकेच्या स्थापनेपासून १२ हजार २२७ कोटी रूपये उत्पन्न मिळविले आहे. या उत्पन्नामधून मोरबे धरण विकत घेण्यापासून ते शाळा, रस्ते बांधण्यापर्यंत अनेक विकासकामे केली असून १,५६५ मालमत्ता पालिकेच्या मालकीच्या झाल्या असून त्यांची किंमत २५ हजार कोटीपेक्षा जास्त आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरील अविश्वास ठराव दाखल करण्याचे निश्चित झाल्यापासून महापालिकेची मोठ्याप्रमाणात बदनामी सुरू झाली आहे. मुंढे हे प्रामाणिक अधिकारी आहेत यामध्ये कोणालाच शंका नाही पण त्यांचा प्रामाणिकपणा सिद्ध करण्यासाठी महापालिका कशी भ्रष्टाचारी आहे, हे बिंबवण्यासाठी त्यांचे समर्थक धडपडत आहेत. सोशल मीडियामधून भ्रष्टाचाराचे खोटे मेसेज पसरविले जात आहेत. यामध्ये सर्वात हास्यास्पद मेसेज १ लाख कोटी रूपये भ्रष्टाचाराचा आहे. स्थापनेपासून पालिकेच्या गंगाजळीमध्ये फक्त १२२२७ कोटी रूपये जमा झाले असताना १ लाख कोटी रूपयांचा घोटाळा कसा होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. घोटाळे दाखविण्याच्या स्पर्धेमध्ये आतापर्यंत केलेल्या चांगल्या कामांकडे दुर्लक्ष होत आहे. राज्यातील प्रत्येक शहरामध्ये गतवर्षी दुष्काळामुळे आठवड्यातून दोन ते तीन दिवस पाणी दिले जात असताना नवी मुंबईमध्ये मात्र रोज नियमित पाणीपुरवठा केला जात होता. मुंबई, ठाणे व कल्याणसारख्या शहरामध्ये कचरा टाकण्यासाठी डंपिंग ग्राऊंड नसताना नवी मुंबईमध्ये मात्र अत्याधुनिक पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावली जात आहे. जिल्हा परिषदेच्या गळक्या शाळांच्या जागेवर भव्य इमारती उभ्या राहिल्या. प्रत्येक नोडमध्ये उद्याने निर्माण झाली. चांगले रस्ते, पाणीपुरवठ्याची सोय करण्यात आली असून या सर्व कामांकडे दुर्लक्ष होत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजावर भ्रष्टाचाराचे आरोप यापूर्वीही अनेक वेळा झाले आहेत. पण या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे अनेकवेळा उघडकीस आले आहे. आतापर्यंत झालेल्या कामकाजामध्ये चुकीचे झालेच नाही असा दक्ष नागरिकांचा दावा नाही. पण ज्या पद्धतीने काही दिवसांपासूून भ्रष्टाचाराविषयी बातम्या पेरल्या जात आहेत त्या शहराची बदनामी करणाऱ्या असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. कोणत्याही कामात गैरव्यवहार झाला असेल तर त्याविषयी कायदेशीरपणे चौकशी झाली पाहिजे. कामाचे लेखा परीक्षण झाले पाहिजे. लेखा परीक्षणामध्ये घोटाळा झाल्याचे निदर्शनास आल्यास रीतसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करावी. जे जबाबदार असतील त्या सर्वांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत पण सर्व पालिकाच भ्रष्टाचारी असल्याच्या अफवा पसरवून शहरवासीयांची बदनामी करणे थांबविण्याची मागणी केली जात आहे. २५ वर्षांमध्ये २५ हजार कोटीची मालमत्ता संकलित पाणीप्रश्न सोडविण्यासाठी मोरबे धरण विकत घेतले. मोरबे धरण परिसरातील १५०० एकर जमिनीची मालकी १२ लाख ८३ हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर १५६ उद्याने व ६७ मोकळ्या जागापालिकेच्या मालकीच्या १५६५ मालमत्ता शहरात शाळांसाठी ७० इमारतीरूग्णालय, नागरी आरोग्य केंद्र व समाज मंदिराच्या इमारतीचे बांधकामअत्याधुनिक मलनि:सारण केंद्रांची उभारणीडंपिंग ग्राऊंडसाठी ६५ एकर जमीन ताब्यात चांगली कामे दुर्लक्षित महापालिकेने आतापर्यंत केलेली चांगली कामे दुर्लक्षित केली जात आहे. २४ वर्षांमध्ये चांगले काहीच झाले नाही, फक्त घोटाळेच झाले असे वातावरण तयार होत असून ते शहराच्या हिताचे नसल्याचे मत नगरसेवकांनी व्यक्त केले आहे. आयुक्तांच्या विरोधात होणाऱ्या अविश्वास ठरावाच्या सभेमध्ये या सर्वांचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
एक लाख कोटीच्या घोटाळ्याची अफवा
By admin | Published: October 24, 2016 3:08 AM