मुंबई : मुंबईत रेल्वेमार्गाच्या बाजूला, तसेच काही रस्त्यांलगत उघड्यावर शौचास बसण्याचे प्रकार थांबावेत, यासाठी २०१७ अखेरपर्यंत एक लाख शौचालये बांधणार असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली. जनार्दन चांदूरकर, संजय दत्त, भाई जगताप, प्रा. जोगेंद्र कवाडे आदींनी लक्षवेधीच्या माध्यमातून मुंबईतील शौचालयांची समस्या मांडली. मुंबईत एकूण ७४० झोपडपट्ट्या असून, यात सुमारे साठ लाख लोक राहतात. यापैकी सुमारे दहा लाख लोकांना सार्वजनिक शौचालयांचा वापर करावा लागतो. मुंबई आणि उपनगरात सार्वजनिक शौचालयांची संख्या खूपच कमी आहे. परिणामी, मुंबईत आजही रस्त्यालगत, रेल्वे मार्गावर प्रातर्विधी उरकले जातात, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता. याला उत्तर देताना राज्यमंत्री पाटील म्हणाले, ‘मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेची २० हजार ६५ शौचालये आहेत. याशिवाय, म्हाडा आणि इतर संस्थांनी ८८ हजार ८८० शौचालये बांधली आहेत. महापालिकेने अतिरिक्त ५ हजार ३०० शौचालये बांधण्याचे नियोजन केले आहे. मुंबईला हागणदारीमुक्त करण्यासाठी स्वच्छ भारत, स्वच्छ महाराष्ट्र, स्वच्छ मुंबई अभियानाअंतर्गत केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्नशील आहे.’ (प्रतिनिधी)
मुंबईत उभारणार एक लाख शौचालये
By admin | Published: April 07, 2016 2:47 AM