ऑनलाइन लोकमतसांगली, दि. 31 - अनैतिक संबंधांच्या संशयावरून मेहुणा नानासाहेब तुकाराम देवकर (वय ५५) यांचा डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून खून केल्याप्रकरणी कमळापूर (ता. खानापूर) येथील आरोपी विलास खाशाबा साळुंखे (वय ५५) यास दोषी धरुन जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनाण्यात आली. पत्नी चिंगुबाई साळुंखे (४८) हिच्यावर खुनीहल्ला केल्याप्रकरणीही त्याला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्धन प्रताप देसाई यांनी मंगळवारी हा निकाल दिला.आरोपी विलास साळुंखे हा पत्नी चिंगुबाई, मुले व सुनेसोबत कमळापुरातील वडाचा माळ येथे राहत होता. त्याची बहिणी नानासाहेब देवकर यास दिली होती. काही वर्षापूर्वी बहिणीचे निधन झाले. त्यामुळे देवकर हा साळुंखेच्या घरी राहत होता. पत्नी चिंगुबाई व मेहूणा देवकर यांच्यामध्ये अनैतिक संबंध असल्याचा त्याला संशय होता. यावरुन त्याने पत्नी व मेहूण्याशी अनेकदा भांडण काढले होते. १२ डिसेंबर २०१५ रोजी दुपारी साडेचार वाजता चिंगुबाई घराबाहेर कटट्यावर शेंगा फोडत बसल्या होत्या. देवकर घरात हॉलमध्ये झोपले होते. सून रुपाली साळुंखे चहा करीत होती. त्यावेळी साळुंखे कुऱ्हाड घेऊन थेट हॉलमध्ये गेला. गाढ झोपेत असलेल्या देवकर यांच्या डोक्यात दोन वेळा कुऱ्हाडीने हल्ला केला होता. यामध्ये देवकर जागीच मरण पावला होता. चिंगुबाई यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करताच त्यांच्यावरही त्याने हल्ला केला होता. या घटनेनंतर साळुंखे कुऱ्हाड घरात टाकून दुचाकीवरुन पळून गेला होता. सून रुपाली यांनी ही घटना पाहिली होती. न्यायालयाने साळुंखे यास खून व खुनीहल्ला केल्याप्रकरणी देवकर यांच्या खूनप्रकरणी जन्मठेप व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावास, तसेच पत्नीवर खुनीहल्ला केल्याप्रकरणी सात वर्षे सक्तमजुरी, दोन हजार रुपये दंड, दंड दिल्यास सहा कारावासाची शिक्षा सुनावली.सूनेची साक्ष ठरली महत्वाचीसरकारतर्फे या खटल्यात सहाय्यक जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख यांची नियुक्ती झाली होती. अॅड. देशमुख यांनी नऊ साक्षीदार तपासले. यामध्ये सून रुपाली साळुंखे, विश्वास गायकवाड, पंच उमाजी शिरतोडे, निखील गायकवाड, वैद्यकीय अधिकारी राजेंद्र डिग्रजे, विशाल ठोंबरे व तपास अधिकारी विट्याचे पोलिस निरीक्षक मोहन जाधव, उपनिरीक्षक अमोल शिंदे यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या.
मेहुण्याच्या खूनप्रकरणी एकास जन्मठेप
By admin | Published: January 31, 2017 8:32 PM