- व्ही़एस़ कुलकर्णी, उदगीर जि.लातूर
ते जन्मताच अंध नव्हते. परंतु कुणाला वाढत्या वयाने आलेल्या मोतीबिंदूने मोत्यासारख्या डोळ्यांपुढे अंधार झाला. एखाद्या किरकोळ आजाराकडे झालेल्या दुर्लक्षामुळे कुणाच्या आयुष्यातला ‘प्रकाश’ हरवला. दृष्टीच गेल्याने सृष्टी पोरकी झालेल्या रुग्णांना उदगीरमध्ये एक मोफत सेवा देणारा आधारवड भेटला आणि त्यांच्या डोळ्यांपुढील अंधार दूर झाला. उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालयाने घेतलेल्या शिबिरात ७ लाख लोकांच्या मोफत तपासण्या झाल्या आणि १ लाख रुग्णांच्या डोळ्यांचे मोफत आॅपरेशन झाले. ‘उदयगिरी पॅटर्न’ म्हणून आता ही सेवा ओळखण्यात येत आहे.डॉ़ रामप्रसाद लखोटिया व दिवंगत डॉ़ श्रीराम कुंटूरकर यांच्या पुढाकारातून २००५मध्ये उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालयाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली़ ग्रामीण भागात शिबिरे व सातत्यपूर्ण तपासणी व शस्त्रक्रियांनी महत्त्वपूर्ण टप्पे पूर्ण करत रुग्णालयाने नावलौकिक मिळविला. जगभरातील तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय नेत्रतज्ज्ञ व विद्यार्थ्यांचे शिबिर आणि भेटी यांची परंपरा रुग्णालयाने रुजविली़ या रुग्णालयामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे.देशभर नावलौकिक : लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्थांकडून यथायोग्य मदत मिळवित रुग्णालयाने मोतीबिंदू शस्त्रक्रियेवरच न थांबता, ग्लाकोमा, लहान मुलांचे डोळ्यांचे आजार व मधुमेहामुळे येणारे अंधत्व दूर करण्यासाठी अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असा डायबेटिक रेटिनोपेथी विभाग सुरू केला आहे.स्वच्छता, उत्तम नियोजन, तंत्रज्ञानाची उपलब्धता, तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक, प्रशस्त इमारत व निवास व्यवस्थेमुळे देशात नेत्र रुग्णालयाने नावलौकिक मिळविला आहे. समाजातील लोकांच्या सहकार्याने हे शिवधनुष्य आम्ही पेलले आहे. गरीब रुग्णांसाठी मोफत किंवा अत्यल्प दरात सर्व आधुनिक सुविधा दिल्यामुळे समाजाच्या शेवटच्या थरापर्यंत मदत करणे शक्य झाले आहे. ही फक्त सुरुवात असून, लॉयन्स नेत्र रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ़ रामप्रसाद लखोटिया यांनी सांगितले.