मुंबई : अल्पावधीतच मुंबईकरांच्या पसंतीस उतरलेल्या मेट्रोने एक आगळावेगळा रेकॉर्ड केला आहे. एका महिन्यात एक कोटी प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक असल्याचे मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडकडून सांगण्यात आले. ४,५०० कोटी रुपये खर्चून ८ जून रोजी घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा अशी मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली. मेट्रो मुंबईकरांच्या पसंतीस उतरावी यासाठी मेट्रोचे भाडे फक्त १० रुपये ठरवण्यात आले. कुठल्याही स्थानकापर्यंतच्या प्रवासासाठी फक्त १० रुपये आकारणी केली जात असल्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरवासीयांनी मेट्रोचा पुरेपूर आनंद लुटला. महिनाभरासाठी १० रुपये आकारणी असल्याने मेट्रो प्रशासनाला याचा पुरेपूर आर्थिक फायदाही झाला. मेट्रो सुरू झाल्यावर सुरुवातीला रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या २ लाख ४० हजार एवढी होती. त्यानंतरच्या काही दिवसांत हा आकडा वाढून ३ लाख झाला, तर शनिवार आणि रविवारी येणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक असल्याने प्रवाशांचा आकडा आणखीच वाढून तो ५ लाख एवढा झाला. त्यामुळे आतापर्यंत मेट्रोतून १ कोटी प्रवाशांनी प्रवास केल्याचे मेट्रोच्या प्रवक्त्याकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
मुंबई मेट्रोचे महिन्यात एक कोटी प्रवासी
By admin | Published: July 07, 2014 4:07 AM