भुसावळ : जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार गुलाबराव पाटील यांना धरणगाव रेल्वे स्थानकावर गेटमन व स्टेशन मास्तरला मारहाण केल्याच्या गुन्ह्यात एक महिन्याची साध्या कारावासाची शिक्षा भुसावळ लोहमार्गचे न्या़ मनीष फटांगरे यांनी सुनावली़तक्रारदारास ५० हजार रुपये भरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले़ पाटील यांना लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांची वैयक्तीक जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली़ ६ एप्रिल २००२ रोजी धरणगाव रेल्वे गेटवरून रिक्षाचालक धर्मेश जात असताना रेल्वे येत असल्याने गेटचा दांडा रिक्षावर पडून काच फुटली होती़ त्यानंतर रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू असतानाच गुलाबराव पाटील तेथे आले. धर्मेश यास विचारपूस केल्यानंतर त्यांनी स्टेशन मास्तरचे कार्यालय गाठून गोंधळ घालत शिवीगाळ व मारहाण केली होती़ स्टेशन मास्तर विजय सुसरे यांनी पाटील यांना बसायला खुर्ची न दिल्याने त्यांनी त्यांच्या कानशीलातही लगावली होती तसेच रेल्वेचे लखनलाल मीना यांनाही मारहाण केली होती़ या गुन्ह्यात फिर्यादीसह सात साक्षीदार तपासण्यात आले त्यातील दोघे फितूर झाले़ (प्रतिनिधी)
आमदार गुलाबराव पाटील यांना एक महिन्याची शिक्षा
By admin | Published: May 20, 2015 1:48 AM