अजित पवारांचा एक आमदार संघ मुख्यालयात; दादांनी यायला हवं, महायुती नेत्यांचा आग्रह
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 10:29 IST2024-12-19T10:27:08+5:302024-12-19T10:29:22+5:30
अजित पवारांनी इथं यायला काही हरकत नाही. संघाची मेहनत, शिंदे सरकारने केलेली कामे यातून महायुतीला भरघोस यश मिळालं आहे असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले आहे.

अजित पवारांचा एक आमदार संघ मुख्यालयात; दादांनी यायला हवं, महायुती नेत्यांचा आग्रह
नागपूर - हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरात आलेल्या महायुती आमदारांसाठी संघाच्या मुख्यालयात बौद्धिक शिबीर आयोजित करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला भाजपा, शिवसेना आमदार नेते उपस्थित आहेत. मात्र अजित पवार इथं येणार का अशी चर्चा सुरू आहे. त्यातच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे तुमसरचे आमदार राजू कारेमोरे इथं दाखल झाले. सकाळपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही हजेरी लावली परंतु अजित पवारांनीही संघाच्या बौद्धिक शिबिराला यावं असा आग्रह महायुतीच्या नेत्यांनी धरला आहे.
यावेळी आमदार राजू कोरेमोरे यांनी म्हटलं की, बाकी आमदार कधी येणार हे माहिती नाही. मी स्वत:हून इथं आलोय. डॉ. हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतले, पक्षाकडून कुठलाही आदेश नाही असं त्यांनी सांगितले आहे. तर महायुतीचे सगळे नेते इथं आलोय. आम्ही जसं काम एकत्र केलंय तसं रेशीमबागेत सगळे जमलोय. संघाने जे काम केले नाकारू शकत नाही. त्यांनी फक्त भाजपासाठी काम केले नाही तर महायुतीच्या प्रत्येक घटकाला निवडून आणण्यासाठी काम केले आहे. त्यामुळे अजित पवारही इथं येतील आणि चांगली ऊर्जा घेऊन जातील असं मला वाटतं. संघाने महायुतीसाठी केलंय. संघाचा मोठा सहभाग आहे हे राष्ट्रवादी, शिवसेनाही नाकारू शकत नाही असं भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी म्हटलं.
तर संघ आणि शिवसेनेचे नाते पूर्वीपासून राहिले आहे. बाळासाहेबांचे विचार आणि संघाचे विचार सारखेच आहे. शिवसेना-भाजपा युती ही हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व याच मुद्द्यावर झाली. मातोश्रीवर गेल्यावर बाळासाहेबांना भेटल्याचा आनंद होतो तसाच आनंद इथं आल्यावर आम्हाला होतोय. अजित पवारांनी इथं यायला काही हरकत नाही. संघाची मेहनत, शिंदे सरकारने केलेली कामे यातून महायुतीला भरघोस यश मिळालं आहे असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले आहे.
दरम्यान, महायुतीत असूनही आमची विचारधारा शिव-शाहू फुले आंबेडकर यांची आहे. भाजपासोबत आम्ही सहभागी झालो तरी आम्ही विचारधारा सोडली नाही असं अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून सातत्याने सांगण्यात येते. मागील हिवाळी अधिवेशनावेळीही अजित पवारांच्या राष्ट्रवादीने संघ मुख्यालयातील या कार्यक्रमाला दांडी मारली होती. त्यामुळे यंदाही अजित पवार इथं येण्याची शक्यता धूसर आहे. सकाळी ७ वाजल्यापासून अजित पवारांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची गर्दी आहे. त्यामुळे दादा संघ मुख्यालयात जाण्याची शक्यता दिसून येत नाही.