मुंबई : राज्यातील जलाशयांमध्ये केवळ नऊ टक्के पाणीसाठा शिल्लक असून मराठवाड्यात तर हे केवळ एक टक्का पाणी शिल्लक आहे. जून मध्यावर आला तरी ही परिस्थिती असल्याने पाऊस अधिक लांबला तर चिंतेचे सावट अधिक गडद होणार आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी राज्यात सरासरी १६ टक्के पाणीसाठा होता. मराठवाड्यात ५ टक्के पाणीसाठा होता. त्यापेक्षा अधिक भयावह स्थिती यंदा पहायला मिळत आहे. राज्याच्या विविध भागांतील जलाशयांमध्ये शिल्लक पाणीसाठा असा (कंसात गेल्यावर्षीचा साठा) मराठवाडा-१ टक्के (५), कोकण-२९ टक्के (३०), नागपूर- १७ टक्के (१८), अमरावती-१० टक्के (२३), नाशिक-९ टक्के (१६) आणि पुणे-७ टक्के (१८).राज्यातील ४९८९ गावे आणि ७९३९ वाड्यांना १३ जूनपर्यंत ६१४० टँकर्सद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. त्यामध्ये मराठवाड्यातील २९५६ गावे आणि १०२७ वाडयांचा समावेश असून त्यांना ४००३ टँकर्सच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे.रोजगार हमी योजनेंतर्गत ४० हजार ४४३ कामे सुरू असून या कामांवर ६ लाख ९० हजार मजूर काम करीत आहेत. (विशेष प्रतिनिधी)
जूनच्या मध्यातही मराठवाड्यात एक टक्केच जलसाठा
By admin | Published: June 17, 2016 2:58 AM