निवडणुकीत एकाने ४५ कोटी खर्च केलेत, मी १०-१२ कोटींवर भागवलं; NCP आमदाराचा खळबळजनक दावा
By प्रविण मरगळे | Updated: March 11, 2025 17:02 IST2025-03-11T17:02:02+5:302025-03-11T17:02:36+5:30
Prakash Solanke Statement: निवडणूक आयोगाने प्रकाश सोळंके यांच्या विधानाची दखल ताबडतोब घ्यायला हवी. यामुळे त्यांची आमदारकीही जाईल अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे.

निवडणुकीत एकाने ४५ कोटी खर्च केलेत, मी १०-१२ कोटींवर भागवलं; NCP आमदाराचा खळबळजनक दावा
मुंबई - विधानसभा निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा कायद्याने आखून दिलेली असते. एका उमेदवाराला ४० लाखाहून जास्त खर्च करता येत नाही. मात्र या नियमाला धाब्यावर बसवून अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदाराने मी निवडणुकीत १०-१२ कोटी खर्च केल्याचं म्हटलं आहे. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात या आमदाराने २३ लाख खर्च केल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे निवडणूक आयोगालाही या आमदाराने खोटी माहिती दिली का असा प्रश्न आहे.
राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके असं या आमदारांचं नाव असून बीडमधील एका कार्यक्रमात त्यांनी निवडणुकीच्या खर्चाबाबत विधान केले आहे. ते म्हणाले की, निवडणूक आली की किती उमेदवार त्यात उभे राहतात त्याला काही मोजमाप नाही. कुणीही येते आणि उभं राहते. कुणीही येते पैशाच्या मस्तीत उभं राहते अशी दुर्दैवाने परिस्थिती झाली आहे. मागच्या निवडणुकीत एका उमेदवाराने ४५ कोटी खर्च केले असं ऐकिवात आहे. लोक बोलतात ते मी सांगतो, मला माहिती नाही. एकाने ३५ कोटी खर्च केले असं ऐकले, मी १०-१२ कोटीपर्यंत मर्यादित राहिलो पण निवडून आलो असं त्यांनी लोकांना सांगितले.
विधानामुळे आमदार सोळंके अडचणीत
आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली द्यायची हे बोलण्याचं धाडस या लोकांचे होते. निवडणूक आयोग काही करणार नाही, उद्या ते माध्यमांनाच खोटे ठरवतील, माझ्या बोलण्याचा तो अर्थ नव्हता बोलतील. परंतु प्रकाश सोळंके यांनी गुन्हा केला आहे. निवडणूक आयोगाला खोटं प्रतिज्ञापत्र दिले हा फौजदारी गुन्हा आहे. त्यांच्यावर कोण कारवाई करणार, निवडणूक आयोग असून नसल्यासारखा आहे. सरकार त्यांच्यावर कारवाई करेल असं वाटत नाही, एवढा पैसा कुठून आला हे तपासले पाहिजे अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी दिली आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाने प्रकाश सोळंके यांच्या विधानाची दखल ताबडतोब घ्यायला हवी. यामुळे त्यांची आमदारकीही जाईल. अफाट पैसा निवडणुकीत खर्च केला जातो. ४० लाखांची मर्यादा असते, त्यात हे उघडपणे बाहेर आले आहे. सगळ्यांचे एक एक कांड रोज बाहेर येतायेत. १० कोटी कदाचित अंदाजित रक्कम असू शकतो, त्याही पेक्षा जास्त खर्च केला असेल असं सांगत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रकाश सोळंके यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.