लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यसभेच्या ३ सप्टेंबरला होणाऱ्या निवडणुकीत महायुतीमध्ये एक जागा अजित पवार गटाला दिली जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे एकच जागा भाजपच्या वाट्याला येईल, असे म्हटले जाते.केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि उदयनराजे भोसले हे भाजपचे राज्यसभा सदस्य लोकसभेवर निवडून गेले. त्यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला. विधानसभा सदस्यांमधून ते राज्यसभेवर निवडून गेले होते. आता या २ जागांसाठी निवडणूक होणार आहे.
सातारा लोकसभेची जागा २०१९ मध्ये राष्ट्रवादीने (श्रीनिवास पाटील) जिंकली होती. ही जागा आपल्याला मिळावी असा आग्रह अजित पवार गटाने महायुतीत धरला होता. मात्र, भाजपने उदयनराजे भोसलेंसाठी ही जागा आपल्याकडे घेतली. त्याचवेळी, ‘आम्ही लोकसभेची सातारची जागा भाजपला सोडली. त्या बदल्यात राज्यसभेची उदयनराजेंची जागा भविष्यात रिक्त झाल्यास ती आम्हाला देण्याचा शब्द भाजपने दिला’ असे लोकसभा निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले होते.
जागा आमच्याच पक्षाला
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी, अजित पवारांच्या दाव्याला पुष्टी दिली. सातारची जागा आमच्याकडे घेताना राज्यसभेची भविष्यात रिक्त होणारी जागा आम्ही अजित पवार गटाला देऊ असा शब्द दिलेला होता, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. मात्र, या बाबतचा अंतिम निर्णय भाजपचे संसदीय मंडळ घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यसभेची एक जागा आमच्याच पक्षाला मिळणार असा पुनरुच्चार अजित पवार यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केला.
जानकरांच्या नावाचीही चर्चा
अशीही चर्चा आहे की नितीन पाटील यांच्याऐवजी माजी मंत्री महादेव जानकर यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो. जानकर यांनी अजित पवार गटाच्या कोट्यातून परभणीमधून लोकसभा निवडणूक लढविली होती पण ते पराभूत झाले होते. त्यांना विधान परिषदेवर पाठविले जाईल, असे म्हटले जात होते पण त्यांना संधी दिली गेली नाही.