पनवेल : ‘एक धाव दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी’ हा संकल्प घेऊन खारघर जिमखाना यांच्या वतीने रविवारी खारघर मान्सून मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. मॅरेथॉनमध्ये आबालवृद्धासह सेलीब्रिटीही धावले. एकूण आठ गटांत झालेल्या या स्पर्धेत तब्बल पाच हजार स्पर्धक यात सहभागी झाले होते. खुल्या वर्गातील स्पर्धकांमध्ये १६ किमी अंतरामध्ये महिलांमध्ये दर्शना गवळी विजेती ठरली, तर पुरु ष गटात अनिल पवारने प्रथम क्रमांक पटकावला. ८ वर्षांखालील मुलीमुलांमध्ये पौर्णिमा विनोदने प्रथम क्र मांक पटकावला. १२ वर्षांखालील गटात आदर्श चव्हाण आणि प्रतीक्षा कुळये हे प्रथम आले. १६ वर्षांखालील गटात ऋतुुजा सकपाळ आणि अनिल बिंड यांनी बाजी मारली. स्पर्धेचे आयोजक गुरुनाथ गायकर यांनी सांगितले की, यंदा महाराष्ट्रात विविध ठिकाणी दुष्कळाच्या झळा बसल्या आहेत. शहरी भागात परिस्थिती वेगळी असली तरी याबाबत विचारविनिमय करण्याची गरज आहे. स्पर्धेच्या माध्यमातून १ लाखांहून अधिक निधी नाम फाउंडेशन आणि कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून देण्याचा प्रयत्न आहे. मॅरेथॉनला मराठी अभिनेता कॉमेडी किंग विजय पाटकर, बालकलाकार सक्षम कुलकर्णी, शेकापचे माजी आमदार विवेक पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस संजीव नाईक, आमदार धैर्यशील पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळाराम पाटील, पनवेल नगर परिषदेचे माजी अध्यक्ष जे. एम. म्हात्रे, रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे, पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती हरीश केणी, खारघर ग्रामपंचायत सरपंच सिद्धी घरत, माजी सरपंच संतोष तांबोळी, संतोष गायकर, अजित अडसुळे, सचिन पाटील, सुदर्शन नाईक, संदीप पाटील, संकेत गायकर यांच्यासह खारघरमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी एक धाव
By admin | Published: June 27, 2016 1:59 AM