'वन रुपी क्लिनिक'चे संस्थापक डॉ. राहुल घुले (Dr. Rahul Ghule) यांनी मानसिक त्रासातून ३० गोळ्या घेतल्यानं त्यांच्यावर रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आली आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून डॉ. राहुल घुले हे मानसिक त्रासाचा सामाना करत आहेत. राजकीय दबाव निर्माण करुन काही राजकीय एजंट्स पैशांची मागणी करत असल्याचा आरोप डॉ. राहुल घुले यांनी केला आहे. याच जाचातून नैराश्यात गेलेल्या डॉ. घुले यांनी एकाच वेळी ३० गोळ्या घेतल्या. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली आणि रुग्णालयात दाखल करण्याच वेळ आली आहे.
महत्वाची बाब म्हणजे गेल्या काही दिवसांपासून राहुल घुले यांनी ट्विटकरत राजकीय एजंट्सकडून पैशांसाठी दबाव आणला जात असल्याचे आरोप केले होते. यासोबतच आपल्या जीवाला धोका असल्याचंही म्हटलं होतं. यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देखील मदत मागितली होती. दरम्यान, कौटुंबिक कारणास्तव डॉ. घुले यांनी केलेले ट्विट त्यांनी डिलीट केले आहेत.
कोरोना संकट काळामध्ये वन रूपी क्लिनिकनंही मोठं योगदान दिलं आहे. नागरिकांसाठी कोविड केअर सेंटर उभं करून त्यांचे कोविड 19 चे उपचार तेथे सुरू होते. राहुल घुले हे वन रुपी क्लिनिकचे संस्थापक आहेत. अवघ्या एक रूपयाच्या फी मध्ये ते रूग्णांवर उपचार करत असल्याने त्यांच्या या उपक्रमाचं मोठं कौतुक झालं होतं. मध्य रेल्वेच्या ठाणे स्टेशनपासून त्यांनी या क्लिनिकची सुरूवात केली होती बघता बघता ही क्लिनिक आता अनेक स्टेशन नजिक उपलब्ध आहेत.