पक्षावर एकानेच वर्चस्व गाजवू नये; युक्तिवादात अजित पवार गटाचा आरोप, सुनावणी महिनाभर लांबली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 07:12 AM2023-10-10T07:12:58+5:302023-10-10T07:14:34+5:30
...पण निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी ९ नोव्हेंबरची तारीख दिली.
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाविषयी भारतीय निवडणूक आयोगापुढे सुरू असलेली सुनावणी आता तब्बल एक महिन्यानंतर, ९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावर दावा करताना अजित पवार गटाने ही सुनावणी तातडीने पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी केली. पण निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी ९ नोव्हेंबरची तारीख दिली.
आज आयोगापुढे अजित पवार गटाकडून ज्येष्ठ विधिज्ञ नीरज किशन कौल, मनिंदर सिंह आणि सिद्धार्थ भटनागर यांनी युक्तिवाद केला, तर शरद पवार गटाकडून अभिषेक मनू सिंघवी आणि देवदत्त कामत यांनी बाजू मांडली. आजच्या सुनावणीला शरद पवार गटाकडून जितेंद्र आव्हाड आणि वंदना चव्हाण उपस्थित होते, तर अजित पवार गटाचे प्रतिनिधित्व त्यांच्या वकिलांनी केले.
शरद पवार गटाला वेळ मिळू नये, म्हणून या प्रकरणाची सुनावणी वेगाने संपविण्याचा अजित पवार गटाकडून प्रयत्न करण्यात आला. मात्र, या प्रयत्नांचा निषेध करीत आयोगाने याप्रकरणी युक्तिवादाची सुरुवात ९ नोव्हेंबरपासून होईल, असे स्पष्ट केले. संपूर्ण दस्तावेज चाळण्यासाठी आम्हाला पुरेसा वेळ मिळावा, ही मागणी आयोगाने मान्य केल्याचे शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितले.
आमदार किती सांगा?
दोन्ही गटांकडून आक्रमकपणे युक्तिवाद करण्यात आला. पक्षावर कोणतीही एक व्यक्ती वर्चस्व गाजवू शकत नाही. पण शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षात लोकशाही नाही, असा आरोप अजित पवार गटाकडून नीरज किशन कौल यांनी केला, तर अजित पवारांकडे असलेल्या आमदारांची नावे आयोगापुढे का सादर केली नाही, असा सवाल शरद पवार गटाने केला.