- श्रीनिवास नागेअवघ्या पंधरा दिवसांमध्ये सांगली मतदारसंघातील लढतीचे चित्र बदलले आणि एकतर्फी वाटणारा सामना दुरंगी झाला. त्यात तिसऱ्याने बिब्बा घातला! आता तो तिसरा कोणाची किती मते खाणार त्यावर निवडणुकीचा निकाल फिरणार आहे.
सांगलीतभाजपाचे विद्यमान खासदार संजय पाटील यांच्यासमोर कोणाचेच आव्हान दिसत नसल्यामुळे सुरुवातीला ही लढत एकतर्फी वाटत होती. मात्र वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी ऐनवेळी रिंगणात उडी घेतली. तिकीट वाटपाच्या गोंधळानंतर ही जागा काँग्रेस आघाडीतील राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे गेली असून, त्यांची ‘बॅट’ विशाल पाटील यांनी हातात घेतली आहे. हुशार आणि आक्रमक तरुण नेते अशी ओळख असलेल्या विशाल यांच्यामुळे हा सामना दुरंगी बनला. पण त्याचवेळी धनगर समाजाच्या व्होट बँकेवर भिस्त असणाºया गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून मैदानात उतरत दुरंगी लढतीत बिब्बा घातला!रासप, भाजप ते वंचित बहुजन आघाडी असा प्रवास करणाºया पडळकर यांनी नऊ महिन्यांपूर्वी खा. पाटील यांच्या मुस्कटदाबीवर तोफ डागत भाजपला रामराम केला. नंतर धनगर समाजाच्या आरक्षणासाठी लढा उभारण्याकरिता राज्यात दौरे करून रसदही मिळवली. आता ते प्रत्यक्ष लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, धनगर, दलित आणि मुस्लिम समाजाच्या मतांवरच त्यांचा डोळा आहे. ही मते मागील निवडणुकीपर्यंत काँग्रेसकडे जात होती. मात्र संजय पाटील यांनी त्या मतांचे विभाजन करण्यात यश मिळवून ती आपल्याकडे वळवली होती. त्या व्होट बँकेला धक्का देऊन संजय पाटलांना हिसका दाखवणे, हेच पडळकरांचे मुख्य उद्दिष्ट आहे. दुसरीकडे ते आपलीही पारंपरिक मते खातील, अशी धास्ती काँग्रेस आघाडीला आहे.
संजय पाटील यांनी लवकर प्रचार सुरू करण्यात बाजी मारली असून, त्यांच्या विरोधातील भाजपमधील धुसफूसही सध्या विझलेली दिसत आहे, तर विशाल पाटील यांनी विश्वजित कदम आणि राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे माफीनामा सादर करून त्यांचा अंतर्गत विरोध थंड केला आहे. तथापि संजय पाटील आणि विशाल पाटील या दोघांनीही एकमेकांवरील नाराजांवर लक्ष ठेवले आहे. त्यांना चुचकारण्यास सुरुवात केली आहे. एकमेकांच्या युती-आघाडीतील नाराजांनी आतून पुरवलेली मदत आणि पडळकरांनी खाल्लेली विरोधकाची मते त्यांना निर्णायक मतांकडे घेऊन जाईल.नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली मागच्या पाच वर्षांत आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी झटलो. सिंचन योजनांसाठी जादा निधी आणला. जिल्ह्यातून जाणाºया महामार्गांचे काम पूर्णत्वाकडे गेले आहे. ड्रायपोर्ट मंजूर करण्यात आले असून, त्याचा फायदा द्राक्ष, बेदाणा यासाठी होणार आहे.- संजय पाटील, भाजपसध्याच्या खासदारांना दुष्काळी भागात पाणी देणे शक्य झालेले नाही. शेतकऱ्यांचे कोणतेच प्रश्न त्यांना सोडवता आलेले नाहीत. दुष्काळात होरपळणाºया पूर्वभागाला मदत दिलेली नाही. या समस्या सोडवण्यासाठी आणि खासदारांची जिल्हाभरातील दंडुकशाही मोडून काढण्यासाठी मी लढत आहे.- विशाल पाटील, स्वाभिमानी