मुंबई : राज्यातील सर्व बसस्थानके आणि आगारांच्या स्वच्छतेसाठी एकच निविदा काढण्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी विधान परिषदेत केली. सकाळी सभागृहाच्या विशेष सत्रात अर्धा तास चर्चा घेण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे ख्वाजा बेग यांनी यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील बसस्थानकाच्या दुरावस्थेचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना रावते म्हणाले की, राज्यातील अस्वच्छ बसस्थानकांमुळे प्रवाशांची गैरसोय होते. त्यामुळे लवकरात लवकर एकच निविदा काढून स्वच्छतेची कामे केली जातील. तसेच तंबाखूमुक्त एसटीसाठी यापूर्वीच स्थानकांवरील तंबाखू विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, विक्रेत्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी त्यांना अन्य वस्तू विक्रीची परवानगी देण्यात आली आहे. तसेच बस चालक, वाहक आणि एस.टी. कर्मचा-यांना तंबाखू न खाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे रावते म्हणाले. राज्यात ५५६ बसस्थानकांच्या नुतनीकरणाचा निर्णय घेण्यात आला असून टप्याटप्याने ही कामे केली जातील. तसेच चालक-वाहक आणि कर्मचा-यांच्या सोयीसाठी आगार परिसरात विश्रामगृहाची उत्तम सोय करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आता या पुढील सर्व कामे एस.टी. महामंडळाकडून करण्याचे धोरण राबविण्यात येणार असून बांधा वापरा आणि हस्तांतरित करा योजना रद्द केल्याचे रावते यांनी स्पष्ट केले. तर, आर्णी बसस्थानकासाठी ४४ लाख ५६ हजार ५५६ रुपये प्रस्तावित खर्च असून स्थानकातील रस्त्याचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. या कामाला लवकरच सुरुवात होईल, असेही रावते म्हणाले. (प्रतिनिधी)
बसस्थानकांच्या स्वच्छतेसाठी एकच निविदा - रावते
By admin | Published: July 28, 2016 4:32 AM