मुंबई : मालवणी दारूकांडाला जबाबदार असलेला मिथेनॉल सप्लायर मन्सूर आतिक खान (३४) याला गुन्हे शाखेने मंगळवारी दिल्लीतून अटक केली. गेल्या अनेक वर्षांपासून तो मालवणीतल्या गुत्त्यांवर दारूपुरवठा करणाऱ्या सलीम शेख उर्फ जेंटल, फ्रान्सिस डिमेलो यांच्यासारख्या अनेकांना मिथेनॉल विकत होता. गुन्हे शाखेने आरोपी फ्रान्सिसकडे केलेल्या चौकशीतून आतिकचे नाव पुढे आले होते. मात्र दारूकांड घडल्यानंतर आतिक अंडरग्राऊंड होता. अखेर गुन्हे शाखेने तांत्रिक तपास आणि खबऱ्यांच्या माध्यमातून आतिक दिल्लीत असल्याची माहिती मिळवून ही कारवाई केली. दिल्लीतील स्थानिक न्यायालयातून ट्रान्झिट रिमांड मिळवून आतिकला बुधवारी मुंबईत आणण्यात येईल. ही कारवाई एसीपी सुनील देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मालवणीच्या गेट क्रमांक ५ येथील झोपडपट्टीत राहाणारा आतिक गुजरातच्या वापी आणि सिल्वासा परिसरातून मिथेनॉलची तस्करी करत होता, अशी माहिती पुढे आली आहे. चौकशीत त्याने तो ज्यांच्याकडून मिथेनॉल खरेदी करे त्यांची नावे गुन्हे शाखेला दिली आहेत. त्यानुसार गुन्हे शाखेची पथके गुजरातेत रवाना झाल्याची माहिती मिळते.आतिकचे वडील पूर्वीपासून गावठी दारू, मिथेनॉलच्या धंद्यात होते. वडिलांच्या निधनानंतर आतिकने हा धंदा सुरू केला, अशी माहितीही पुढे आली आहे. फ्रान्सिसच्या घरातून गुन्हे शाखेने हस्तगत केलेला सुमारे १००० लीटर द्रवपदार्थ मिथेनॉल असल्याचा संशय आहे. हा पदार्थ चाचणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत धाडण्यात आला असून त्याचा अहवाल अद्याप गुन्हे शाखेला मिळालेला नाही.
एक हजार कोटी रु.मंजूर
By admin | Published: June 24, 2015 3:45 AM