अमित सोमवंशी -
सोलापूर, दि. 02 - देशभरात गाजत असलेल्या सोलापूर येथील इफेड्रीन साठा प्रकरणी ठाणे पोलिसांनी नेपाळ सीमेवरुन जय मुखी ( रा. मुंबई) याला अटक करुन मुंबईत आणले. चौकशीदरम्यान त्याने सोलापुरातून अहमदाबादला एक टन इफेड्रीन नेल्याचे पोलिसांना सांगितले.
येथील चिंचोली एमआयडीसीतील एव्हॉन लाईफ सायन्सेस लिमिटेड कंपनीत २३ टन इफेड्रीन जप्त करण्यात आल्यानंतर रोज नवनवे प्रकरण उजेडात येत आहेत. जेवढे खोल जात आहे तेवढीच या प्रकरणाची खोली वाढत आहे़. एव्हॉन कंपनीतून काही इफेड्रीन सौदी अरेबिया आणि अल्जेरिया या देशांमध्ये धाडल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या तपासात उघड झाली आहे. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंमली पदार्थविरोधी विभागाच्या दोन पथकांनी सोलापुरातच ठिय्या मारला होता.
आठवडाभराच्या तपासानंतर ही पथके ठाण्याला परतली. या प्रकरणाची व्याप्ती पाहता तपासाबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. सोलापुरातील इफेड्रीन साठा प्रकरणी एव्हॉन सायन्सेस लिमिटेड कंपनी सील करून ठाणे पोलिसांनी कारखान्याच्या आवारात बंदोबस्त पथक नेमले आहे. ठाणे पोलिसांनी इफेड्रीन प्रकरणातील संशयित आरोपी जय मुखी यास नेपाळ सीमेवरुन अटक करुन विमानाने मंगळवारी रात्री मुंबईत आणले.
दहा दिवसांची पोलीस कोठडी
ठाणे पोलिसांनी जय मुखी याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, तो सोलापुरात येऊन लॉज व एव्हॉन कंपनीच्या विश्रामगृहात राहत असे. सोलापुरातून त्याने अहमदाबादला इफेड्रीन नेल्याचे चौकशीत सांगितले. न्यायालयाने जय मुखी याला दहा दिवसांची पोलीस कोठडी दिल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक अमोल वालजडे यांनी सांगितली.
यांनी केली कारवाई
पोलीस आयुक्त परमवीर सिंग, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा पराग मनेरे, सहायक पोलीस आयुक्त भरत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल वालजडे, पोलीस नाईक दिलीप सोनवणे, प्रीतम भोगले, महादेव चाबुकस्वार आदींनी ही कामगिरी केली.
ठाण्यांचे पथक होते गोरखपुरात
नेपाळ सीमेवर जय मुखी असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानंतर १९ मे ते ३० मेपर्यंत ठाण्याचे पथक गोरखपुरात जय मुखीचा शोध घेत होते. ३० मे रोजी गोरखपुरातील रेल्वे स्टेशनजवळून जय मुखी यास ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले. नेपाळ सीमेवरुन जय मुखी हा पळून जाण्याच्या तयारी होता, त्यास ठाणे पोलिसांनी पकडून त्याचा पासपोर्ट ताब्यात घेतल्याचे अंमली पदार्थविरोधी पथक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अमोल वालजडे यांनी सांगितले.