- जयंत धुळप
अलिबाग, दि. 16- अलिबागच्या समुद्रामध्ये बुडालेल्या दोन जणांपैकी एकाचा मृतदेह सापडला असून बुडालेल्या दुसऱ्याचा शोध अजूनही सुरू आहे. अलिबाग समुद्रातील कुलाबा किल्ल्यातून मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास भरतीच्या पाण्यातून अलिबाग किनाऱ्याकडे येत असताना बुडून बेपत्ता झालेल्या दोन पर्यटकांपैकी एकाचा मृतदेह सापडला आहे. सौरभ खान (23) याचा मृतदेह बुधवारी सकाळी ७.३०वाजता नैसर्गीक भरतीच्या वेळी तुषार शासकीय विश्रामगृहाजवळ अलिबाग समुद्र किनाऱ्यावर सापडला. तर दुसऱ्या व्यक्तीचा अजूनही शोध सुरू आहे.
बेपत्ता असलेल्या ऋषभ सिव्हा (24, सध्या रा.रसायनी,मुळ रा.गोवा) याच्या शोध घेण्यासाठी अलिबाग कोळीवाड्यातील कोळी बांधवांच्या सहकार्याने कुलाबा किल्ला परिसरात शोध मोहीम सुरु असल्याची माहिती अलिबागचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुरेश वराडे यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे. मृत सौरभ खान हा मुळचा मध्यप्रदेशातील रतलामचा राहणारा असून, त्याचे नातेवाईक त्याचा मृतदेह ताब्यात घेण्याकरीता येथील जिल्हा रुग्णालयात पोहचले आहेत. शवचिकीत्सा प्रक्रीयेअंती मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती वराडे यांनी दिली आहेय
सांगूनही त्यांनी ऐकलं नाहीरसायनीमधील डेकोर होम कंपनीमध्ये सिव्हील इंजिनिअर म्हणून कार्यरत असलेले पाच मित्र मंगळवारी अलिबाग समुद्र किनारी फिरायला आले होते. त्यामध्ये हेबल अभिराम प्रधान,उरप प्रताप मिश्रा, सुरेश स्वामी, सौरभ खान, वृषभ सिव्हा यांचा समावेश होता. यापैकी सुरेश स्वामी, सौरभ खान, वृषभ सिव्हा हे तिघं जण कुलाबा किल्ला पाहण्याकरीता ओहोटीच्यावेळी किल्ल्यात गेले होते तर अभिराम प्रधान व उरप प्रताप मिश्रा हे दोघं अलिबाग किनाऱ्यांवरच थांबले होते. दुपारी २ वाजता भरती सुरु झाल्यावर किल्ल्यात गेलेल्या एकुण आठ पर्यटकांनी या भरतीतून किनाऱ्याकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी या आठ जणांना भरतीच्या पाण्यातून जावू नका, तूम्हाला समुद्राच्या भरतीचा अंदाज येणार नाही, रिस्क घेवू नका,असं या किल्ल्यात कार्यरत पूरातत्व विभागाचे कर्मचारी महेंद्र पवार यांनी विनंतीपूर्वक सांगितलं. आठ जणांपैकी पाच जणांनी पवार यांची विनंती मान्य करुन ते किल्ल्यातच थांबले. परंतू सुरेश स्वामी, सौरभ खान, वृषभ सिव्हा या तिघांनी आपली विनंती ऐकली नाही, आणि ते भरतीच्या पाण्यातून किनाऱ्याकडे गेले, अशी माहिती पूरातत्व विभागाचे कर्मचारी महेंद्र पवार यांनी दिली. सुरेश स्वामी हा सुदैवाने पोहत किनाऱ्यांवर पोहचला. तो किनाऱ्यावर आल्यानंतर सौरभ खान व वृषभ सिव्हा बुडाल्याची माहिती समजली आणि पोलिसांच्या माध्यमातून शोध मोहीम सुरु झाली.
त्या पाच जणांनी ऐकलं आणि ते बचावलेकिल्ल्यातून निघालेल्या आठ पैकी पाच जणांनी आपली विनंती मान्य केली. ते किल्ल्यातच थांबले, आणि सुदैवाने बचावले याचे समाधान पवार यांनी व्यक्त केले. दरम्यान या पाच जणांना लाईफ गार्डच्या बोटीने किनाऱ्यांवर सुखरुप नेण्यात आल्याचेही पवार यांनी सांगितले.