पालघर : ओएनजीसी कडून सर्वेक्षण करण्याआधी मच्छीमार, मच्छीमार संघटना, सहकारी संस्था इत्यादींच्या संयुक्त सभा आयोजित करून सर्वेक्षण करण्याची परंपरा असतांना ती डावलून आखला यंदा कुठल्याही प्रकारची पूर्व कल्पना न देता मासेमारी क्षेत्रातच जबरदस्तीने सर्वेक्षण सुरु करणाऱ्या व मच्छीमारांच्या जीवावर उठणाऱ्या ओएनजीसीला धडा शिकविण्यासाठी तिला हरित लवादा मध्ये खेचणार असल्याची माहिती वसई मच्छिमार सर्वोदय सहकारी संस्था पाचूबंदरचे संचालक संजय कोळी यांनी लोकमतला दिली.ओएनजीसीकडून नेहमीच समुद्रातील भूगर्भातील तेल आणि नैसर्गिक वायूंच्या साठ्याचा शोध घेण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येते.यावर्षी ही जानेवारी ते मे २०१७ दरम्यान मोठ्या महाकाय बोटीच्या सहाय्याने ४२ ते ४५ नॉटिकल सागरी क्षेत्रात सर्वेक्षण सुरु आहे. सेस्मिक असे नाव असलेल्या ह्या सर्वेक्षणासाठी असलेल्या एका मोठ्या जहाजाच्या मागे ६.५ किमी च्या मोठमोठ्या आठ केबल्स जोडण्यात आल्या असून प्रत्येक केबल्स ला एक एअर गन जोडण्यात आली आहे. या गनमधून समुद्रात मोठ्या आवाजाचे स्फोट केले जात असून त्यांच्या आवाजाने माशांचे थवे लांब पळून जात आहेत. समुद्रातील जैविक नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास होत असल्याची माहिती त्यांनी दिली. एप्रिल २०१५ मध्येही समुद्रात ६० ते ७० नॉटिकल क्षेत्रात करण्यात आलेल्या अशाच सर्वेक्षणानंतर मत्स्य उत्पादनात मोठी घट झाल्याचे सांगून अशा सर्वेक्षणावर अमेरिकेसह अनेक देशात बंदी घालण्यात आल्याची माहिती याच संस्थेचे संचालक रवींद्र म्हात्रे यांनी दिली.जिल्ह्यातील वसई ते डहाणूसह गुजरात राज्यातील जाफराबाद च्या समोरील ३० ते ६० नॉटिकलचे क्षेत्र माशांचे पैदास क्षेत्र (गोल्डन बेल्ट)म्हणून ओळखले जाते. या भागात होणाऱ्या थोड्या फार मत्स्य उत्पादनामुळेच मासेमारी व्यवसाय तग धरून आहे. याच भागात सातपाटी, वसई, डहाणू, मुरबे, उत्तन इ. भागातील मच्छिमार नौकाच्या हजारो कवी (खुंट) रोवण्यात आल्या आहेत. तसेच तरंगत्या प्रवाहात दालदा, मगरी, वागरा इत्यादींची मासेमारी ही केली जात असल्याने बोटींची नेहमीच वर्दळ असते. कवींच्या खुंटाला मोठमोठे फ्लोट्स जाडसर दोरखंडाने तरंगत्या स्वरूपात सोडलेले असतात. तर ४ ते ५ किमी अंतरा एवढी जाळी पाण्यात सोडलेली असते. अशावेळी मच्छिमार संस्था, संघटना यांना कुठलीही पूर्व सूचना न देता ओएनजीसीने सर्वेक्षण सुरु केल्याने मच्छीमाराना जाळी लावण्यास जागाच उरलेली नाही. या सर्वेक्षण जहाजाच्या ८ ते १० किमी सभोवताली सुरक्षा रक्षकांच्या बोटी ठेवल्या असून हे रक्षक मच्छीमाराना हाकलून लावत आहेत. या सर्वेक्षणा मुळे अनेक मच्छीमारांची जाळी जहाजाच्या केबल्स मध्ये अडकून मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे मच्छिमार संस्थेचे चेअरमन राजन मेहेर आणि सर्वोदय संस्थेचे सुरेश म्हात्रे यांनी हे सर्वेक्षण बंद करण्याबाबत ओएनजीसीला कळविले आहे.मात्र आता कुठलीही कल्पना न देता हे सर्वेक्षण सुरु केल्यामुळे पालघरच्या ठाणे जिल्हा समाज संघाच्या सभागृहात जिल्ह्यातील मच्छिमार प्रतिनिधींच्या एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या बैठकीत ओ एन जीसी वर नियुक्त समतिीच्या सदस्यांना उपस्थित मच्छीमारांनी चांगलेच धारेवर धरीत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याची माहिती संजय कोळी ह्यांनी दिली. मच्छीमार प्रतिनिधी मौनी का झाले?सर्वेक्षणाच्या ठिकाणी मासे प्रजनन करण्यास अनेक वर्षे येत नसल्याचा अनुभव असल्याने या मुळे आपला मच्छिमार व्यवसाय संपुष्टात आणण्याच्या प्रयत्न ओएनजीसी करीत असताना मच्छिमार समितीचे प्रतिनिधी मूग गिळून गप्प असल्याने याबाबत बैठकीत संशय व्यक्त करण्यात आला.त्यामुळे आपण याविरोधात हरित लावादामध्ये याचिका दाखल करणार असल्याचे कोळी ह्यांनी लोकमतला सांगितले.अटलबिहारी वाजपेयींच्या सरकारमध्ये राम नाईक हे केंद्रात पेट्रोलियम मंत्री असतांना असे सर्वेक्षण सुरू करण्यापूर्वी मच्छिमार प्रतिनिधींशी चर्चा करावी यासाठी एका समितीची नियुक्ती करण्यात आली होती.
ओएनजीसीला मच्छीमार हरित लवादात खेचणार
By admin | Published: February 24, 2017 6:53 AM