नवी मुंबई - निवडणुकीचे वातावरण तापू लागले असताना दुसरीकडे महागाईही वाढू लागली आहे. किरकोळ मार्केटमध्ये कांदा ८० रुपये किलो व लसूण ५०० रुपये दराने विकला जात आहे. निवडणुकीच्या काळात भाववाढ सुरू असल्याने नागरिकांच्या नाराजीच्या रोषामुळे सर्वपक्षीय उमेदवारांचे टेन्शन वाढले आहे.
परतीच्या पावसाचा फटका कांदा उत्पादनावर झाला असून आवक कमी होऊ लागली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी ८३३ टन आवक झाली. एक आठवड्यापूर्वी बाजार समितीत कांदा १८ ते ४८ रुपये किलो दराने विकला जात होता. आता हेच दर ३५ ते ६२ वर पोहचले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये कांदा ७५ ते ८० रुपये किलो दराने विकला जात आहे. वाशी सेक्टर १७ या उच्चभ्रू वसाहतीमधील मार्केटमध्ये हेच दर १०० रुपये किलो एवढे आहेत. अजून दोन आठवडे कांदा दर तेजीत राहतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. एक वर्षापासून लसूणचे दर तेजीत आहेत. बुधवारी बाजार समितीमध्ये लसूण २२० ते ३२० रुपये किलो दराने विकला गेला. किरकोळ मार्केटमध्ये लसूण ५०० रुपये किलो दराने विकला जात आहे. नवीन वर्षात नवीन पीक बाजारात येईपर्यंत लसूणची भाववाढ सुरूच राहण्याची शक्यता आहे.
वाटाणाही २५० पार...- हिरव्या वाटाण्याचाही मार्केटमध्ये तुटवडा निर्माण झाला आहे. बाजार समितीमध्ये वाटाणा १६० ते २०० रूपये किलो दराने विकला जात आहे. - किरकोळ मार्केट मध्ये हेच दर २५० रूपये किलोपर्यंत पोहचले आहेत. - किरकोळ मार्केट मध्ये मेथीची जुडीही ३० रूपये किलो दराने विकली जात आहे. शेवगा शेंगाचे दर किरकोळ मार्केटमध्ये १३० रूपयांवर पोहचले असून वालाच्या शेंगा १२० रूपयांवर पोहचल्या आहेत.