नामदेव मोरे,
नवी मुंबई- गतवर्षी ग्राहकांच्या डोळ्यांतून पाणी काढणाऱ्या कांद्याने या वर्षी शेतकऱ्यांना रडविले आहे. प्रत्येक राज्यात बाजारभाव ६ ते ७ पट घसरले आहेत. गतवर्षी २० ते ८० रुपयांना विकला जाणारा कांदा या वर्षी अन्य राज्यांत २ ते २० रुपये व महाराष्ट्रात १ ते १० रुपये किलो दराने विकला जात आहे. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला बाजारभाव मिळवून देण्यासाठी शासनाने भाजीपाला व फळे नियमनमुक्त केली आहेत. परंतु हा निर्णय घेऊन दोन महिने पूर्ण होण्यापूर्वीच कांद्याचे बाजारभाव गडगडले आहेत. प्रत्येक वर्षी आॅगस्ट व सप्टेंबरमध्ये कांद्याचे भाव वाढतात. चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकरी मार्चपासून शक्य तेवढा माल चाळींमध्ये ठेवतात. गतवर्षी कांद्याला विक्रमी भाव मिळाला होता. महाराष्ट्रात होलसेल मार्केटमध्ये २० ते ६२ रुपये किलो भाव मिळत होता. देशातील सर्वच राज्यांत दर २० ते ८० रुपयांपर्यंत गेले होते. परंतु या वर्षी बाजारभाव प्रचंड घसरले आहेत. १० वर्षांत प्रथमच आॅगस्टमध्ये कांद्याचे दर १ ते १० रुपये एवढे खाली आहेत. शेतकऱ्यांनी कांदा उत्पादन करण्यासाठी व मार्चपासून चाळींमध्ये साठवणूक करण्यासाठी केलेला खर्चही निघत नाही. उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊ लागले आहेत. दोन महिन्यांपासून कांद्याचे दर घसरू लागले आहेत. याविषयी व्यापारी व शेतकरी प्रतिनिधी वारंवार आवाज उठवत असतानाही शासनाने योग्य कार्यवाही केलेली नाही. सप्टेंबर अखेरपासून नवीन कांदा बाजारात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारभाव वाढण्याऐवजी घसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. >शेतकरी नेते गप्प का ?राज्यभर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठविणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत हे राज्याचे पणन राज्यमंत्री आहेत. यामुळे त्यांनी शेतकऱ्यांच्या मालाला चांगला बाजारभाव मिळवून द्यावा, अशी मागणी केली जात आहे.