लासलगाव (जि. नाशिक) : कांद्याचे किमान निर्यात मूल्य कमी केल्यानंतरही निर्यातीमध्ये न झालेली वाढ, राज्यातील तसेच परराज्यातील बाजारपेठांमध्ये आवक वाढल्याने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीामध्ये सोमवारी क्विंटलमागे सरासरी दरामध्ये ९०० रुपयांची घसरण झाली.केंद्र सरकारने मागील सप्ताहामध्येच कांद्याच्या किमान निर्यात मूल्यामध्ये कपात केली होती. सध्या श्रीलंका वगळता इतर देशांमध्ये कांदा निर्यात थंडावलेली आहे. तसेच लाल कांद्याबरोबरच रांगडा कांद्याची नेहमीपेक्षा सुमारे तिप्पट आवक होत आहे. गुजरातसह मध्य प्रदेश व इतर राज्यांत होत असलेली कांदा आवक याचा संयुक्त परिणाम लासलगावसह विविध बाजारपेठांमध्ये जाणवत आहे. कांदा भावात वेगाने घसरण होत असल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. या सप्ताहात गुजरात बरोबरच मध्य प्रदेशसह इतर राज्यांत नवीन कांदा बाजारपेठेत दाखल झाल्याने महाराष्ट्रातील कांद्याची मागणी कमी झाली. त्यामुळे सोमवारपासून कांदा भावात घसरण झाली.
कांद्याच्या दरात विक्रमी घसरण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 4:42 AM