नवी मुंबई :मुंबईत कांद्याचा तुटवडा सुरूच आहे. बुधवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (एपीएमसी) फक्त ५४७ टन आवक झाली असून होलसेल मार्के टमध्ये ५० ते ८० रुपये तर किरकोळ मार्केटमध्ये ८० ते ११० रुपये किलो दराने कांदा विकला गेला.
कांद्याचे दर १ ऑक्टोबरला १० ते २० रुपये प्रतिकिलो होते. २० दिवसांत हे दर चार ते पाच पट वाढले आहेत. दसऱ्यापूर्वीच कांद्याने शंभरी गाठली आहे. राज्यात सर्वच बाजार समितींमध्ये आवक घसरली आहे. घाऊक बाजार समितींमध्ये मुंबई ५० ते ८०, कोल्हापूर २२ ते ७०, पुणे १० ते ७५, औरंगाबाद १० ते ७५, लासलगाव १६ ते ७१ रुपये असे काद्यांचे भाव आहेत.
आयातीचे नियम शिथिल -कडाडलेल्या किमती कमी करण्यास तसेच पुरवठा वाढविण्याकरिता केंद्र सरकारने कांद्याच्या आयातीचे नियम १५ डिसेंबरपर्यंत शिथिल केले. केंद्र सरकार आपल्याकडील कांदाही बाजारात आणणार आहे. खरिपात पिकलेला ३७ लाख टन कांदाही बाजारपेठेत येणार असून त्यामुळेही किमती कमी होण्यास मदत होईल, असा सरकारचा दावा आहे.