नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी १०३६ टन कांद्याची आवक झाली होती. शुक्रवारी अचानक १,९६० टन आवक झाली आहे, परंतु बाजारभाव मात्र १८ ते २२ वरून २५ ते २८ रुपये किलो झाले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये एक किलो कांद्यासाठी २५ ते ३५ रुपये मोजावे लागत आहेत.उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात व राजस्थानमध्ये अतिपावसामुळे कांद्याचे झालेले नुकसान व कर्नाटकसह आंध्र प्रदेशमध्ये पावसाअभावी झालेल्या कांद्याच्या नुकसानीमुळे महाराष्ट्रातील कांद्याचे भाव वधारले आहेत. पूर्ण देशभरात कांदा महाराष्ट्रातूनच पाठविला जात आहे. यामुळे राज्यातील बाजारपेठांमध्ये आवक कमी होऊन भाव वाढले आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी फक्त १०३६ टन कांद्याची आवक झाली होती. बाजारभाव १८ ते २२ रुपये किलो झाले होते. शुक्रवारी यामध्ये पुन्हा वाढ झाली आहे.ग्राहकांची वाढणारी मागणी, रविवार व सोमवारी मार्केट बंद राहणार असल्याने मार्केटमध्ये तब्बल १९६० टन कांद्याची आवक झाली. होलसेल मार्केटमध्येच कांदा २५ ते २८ रुपये किलोने विकला गेला. बाजारभाव वाढलेला असताना सर्व कांदा विकला गेला. अचानक वाढलेल्या भावामुळे किरकोळ विक्रेत्यांनीही भाव वाढविले आहेत. हलक्या दर्जाचा कांदा २५ व चांगल्या दर्जाचा कांदा ३५ रुपये किलो दराने विकला जात आहे.
आवक वाढूनही कांदा तेजीतच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 4:02 AM