- नामदेव मोरे, नवी मुंबईमागणीच्या तुलनेमध्ये आवक कमी झाल्यामुळे राज्यभर कांद्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. नवीन पिकांची अद्याप लागवड झाली नसून ते पीक मार्केटमध्ये येईपर्यंत तेजी कायम राहणार आहे. मुंबईतील किरकोळ मार्केटमध्ये कांदा ५० रुपये किलो दराने विकला जात असून दिवाळीपर्यंत बाजारभाव वाढतच राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गतवर्षी झालेली गारपीट व अवकाळी पावसामुळे उन्हाळी कांद्याचे उत्पन्न कमी झाले होते. कांद्याचा दर्जाही हलका असल्यामुळे तो जास्त दिवस साठवता आला नाही. शेतकऱ्यांनी उन्हाळ्यामध्येच बराचसा कांदा विकला. प्रत्येक वर्षी सप्टेंबरमध्ये कांद्याचा काही प्रमाणात तुटवडा निर्माण होतो. परंतु या वर्षी जुलै अखेरीसच प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. मागणीच्या तुलनेमध्ये आवक खूपच कमी असल्यामुळे बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी ६४ ट्रक व ३९ टेम्पोंमधून कांदा विक्रीला आला आहे. होलसेल मार्केटमध्ये कांदा २६ ते ३६ रुपये किलोने विकला गेला. चांगल्या दर्जाचा कांदा ४० रुपये किलो दरानेही विकला गेला. किरकोळ मार्केटमध्ये कांदा ५० रुपये किलो दराने विकला जात आहे. जुलैमधील हा विक्रमी दर असल्याचे बोलले जात आहे. उन्हाळी कांद्याचा साठा कमी असून पोळ कांद्याची लागवड अद्याप पूर्ण झालेली नाही.-राज्यात कांद्याचे दर वाढू लागले आहेत. मुंबईत किरकोळ मार्केटमध्ये एक किलोसाठी ५० रुपये मोजावे लागत आहेत. पुढील जवळपास तीन महिने भाव वाढत राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. -भाव कमी करण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत. जास्तीत जास्त कांदा विक्रीसाठी उपलब्ध करावा, अशी मागणी होत आहे.
दिवाळीपर्यंत कांदा रडवणार
By admin | Published: July 29, 2015 12:58 AM