- शेखर देसाई, लासलगावकेंद्र शासनाने कांद्याचे किमान निर्यात मूल्य पूर्णपणे हटविण्याचा निर्णय घेतल्याने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल होणारा कांदा ‘भाव’ खाण्याची शक्यता आहे. सोमवारी त्याबाबत अधिक चित्र स्पष्ट होईल.गेल्या काही दिवसांपासून घाऊक बाजारात मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होण्यास सुरुवात झाल्याने त्याचे दर सातत्याने घसरत आहेत. कांद्याचे किमान निर्यात मूल्य कमी करण्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी राज्य व केंद्र सरकारकडेही त्याबाबत विनंती केली.किमान निर्यात मूल्य पूर्णत: हटविल्याने कांद्याची आखाती देशांत मोठ्या प्रमाणात निर्यात होण्यास व पर्यायाने शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळण्यास मदत होणार आहे. सोमवारी लिलावात कांदा दरात प्रतिक्विंटल किमान दोनशे रूपये भाव वाढतील, असा अंदाज व्यक्त होत आहे. मागील आठवड्यात लासलगाव बाजारपेठेत कांद्याची ६२,९८१ क्विंटल आवक झाली तर क्विंटलमागे ७०० ते १,५०० व सरासरी १,११६ रूपये भाव होते. त्यात आता सुधारणा होईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.
कांदा खाणार ‘भाव’!
By admin | Published: December 26, 2015 1:49 AM