मुंबई : अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिका गेल्या सहा वर्षांपासून आॅनलाइन पद्धतीने तपासल्या जात आहेत. हीच पद्धती येत्या वर्षापासून मुंबई विद्यापीठाच्या सर्व अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी वापरली जाणार आहे. एप्रिल महिन्यात झालेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी आॅनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. गुरुवारी याबाबतची निविदा प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांचा ताण वाढला असला, तरीही मुंबई विद्यापीठाचा निर्णय पक्का असल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी सांगितले. शनिवारी मुंबई विद्यापीठात आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीबाबत एक विशेष बैठक घेण्यात आली होती. या वेळी तांत्रिक समितीने आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणी होणार असल्याचे स्पष्ट केले. विद्यापीठाच्या परीक्षा संपल्यावर ४५ दिवसांच्या आत निकाल लागला पाहिजे, असा नियम आहे, पण अनेकदा विद्यापीठाच्या निकालाला उशीर होतो. त्यामुळे कुलगुरू यांनी निकाल लवकर लागण्यासाठी आॅनलाइन तपासणीचा पर्याय निवडला. मार्च २०१७ मध्ये आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली, पण दोन्ही वेळा चांगला प्रतिसाद न मिळाल्याने, आता अटी शिथिल करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीचे तंत्र प्राध्यापकांना शिकवण्यासाठी २४ ते २८ एप्रिलदरम्यान प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या ७ जिल्ह्यांतील ५० केंद्रांवर प्राध्यापकांना हे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले. (प्रतिनिधी)प्रक्रिया सुरू होण्यास दहा दिवस लागणार -ऑनलाइन पद्धतीच्या वापरामुळे निकाल लावण्यासाठी लागणारा वेळ कमी होणार आहे. त्याचबरोबरीने उत्तरपत्रिका तपासणीत होणारे गोंधळ, गुण कमी-अधिक होण्याच्या प्रकारालाही आळा बसणार असल्याचा विश्वास विद्यापीठ प्रशासनाला वाटत आहे. तथापि, एप्रिल महिन्यापासून झालेल्या परीक्षांना हा नियम लागू आहे. त्यामुळे अजूनही उत्तरपत्रिकांची तपासणी झालेली नाही. सध्या सुमारे पाच लाख उत्तरपत्रिका तशाच पडून आहेत. ही प्रक्रिया सुरू होण्यास किमान दहा दिवस लागणार असल्याने, विद्यार्थ्यांचा ताण वाढला आहे.
उत्तरपत्रिकेची तपासणी आॅनलाइनच
By admin | Published: April 24, 2017 3:41 AM