- भक्ती चपळगावकर (bhalwankarb@gmail.com)
तोत्तोचानची गोष्ट दुसऱ्या महायुद्धाच्या काळातली आहे; पण आजूबाजूला युद्ध पेटलंय याचा उल्लेख गोष्टीत मोजक्याच प्रसंगांत होतो. या शाळेतल्या मुलांना युद्धाची झळ निश्चित पोहोचत असणार; पण शाळा मात्र आजूबाजूचे मृत्यूचे तांडव, टंचाई, गरिबी या दु:खद गोष्टीवर फुंकर घालते. शाळा हे ठिकाणच असे आहे. एकदा शाळेत प्रवेश केला की, मुले बाहेरच्या वातावरणापासून दूर जातात आणि आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर एक वेगळे जग निर्माण करतात.
वेगळे जग गेले वर्षभर ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून घरी तयार करण्याचा प्रयत्न झाला. ते निर्माण करणे अशक्य असले तरी मुलांना गुंतवून ठेवण्यात, त्यांच्या शिक्षणात खंड पडू न देण्यात ऑनलाइन शाळेची भूमिका महत्त्वाची ठरते. कोरोनाचा फेरा अजून किती काळ राहणार आहे हे सांगता येणार नाही. गेल्या वर्षी ऑनलाइन शाळा घाईघाईने सुरू झाल्या. त्यामुळे त्यांचे स्वरूप कसे असावे याचा अंदाज शाळा चालकांना नव्हता. फार थोड्या काळात देशभरातील शिक्षकांनी इंटरनेट शिक्षणाचे तंत्र समजावून घेतले आणि अभ्यासक्रम सुरू ठेवला. वर्गात शिकवताना जे प्रत्यक्ष समजावून सांगता येते त्या गोष्टी शिक्षक मुलांना व्हिडिओ, संवाद, प्रात्यक्षिके यांच्या माध्यमातून शिकवीत आहेत. एक पालक म्हणून त्यांच्याबद्दल कृतज्ञताच वाटते.
कोरोनाच्या हल्ल्याची हताशा पचवून इतर गोष्टींकडे लक्ष केंद्रित करण्यात शाळेचे मोठे योगदान आहे. समाजाच्या केंद्रस्थानी असलेल्या शाळांचे अस्तित्व टिकून राहिले. (बहुतेक ठिकाणी) शिक्षकांचे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार सुरू राहिले. संगणक क्रांतीनंतर पहिल्यांदाच जगातल्या अब्जावधी लोकांनी संगणक तंत्रज्ञानाचा वापर आणि उपयोग एवढ्या मोठ्या प्रमाणावर शिक्षणासाठी केला. त्यामुळे ऑनलाइन शाळा हा वर्तमान स्वीकारणे गरजेचे आहे.असे असले तरी ‘It takes a village to bring up a child’ अशी एक म्हण आहे. मुलांना मोठं करण्यात अनेकांचा सहभाग असतो असा याचा ढोबळ अर्थ. मूल मोठं होताना त्याचा अनेकांशी प्रत्यक्ष संवाद होणे आवश्यक आहे. शाळेच्या ग्राऊंडवर मुलांच्या मेंदूला जी चालना मिळेल ती ऑनलाइन वर्गात मिळणार नाही. ऑनलाइन क्लास मुलांना माहिती पुरवील; पण शहाणं करू शकणार नाही. ऑनलाइन शाळा रोबोटिक आहे. त्यात आजूबाजूच्या व्यक्तींचे हावभाव, आवाज, भाषेची लकब, शारीरिक हालचाल या आणि अशा अनपेक्षित गोष्टींतून मिळणारे ज्ञान मिळत नाही.
ऑनलाइन शाळा हा प्रत्यक्ष शिक्षणाला पर्याय नाही हे सत्य आहे. एक पालक आणि एकेकाळची शाळकरी मुलगी म्हणून ही बाब प्रकर्षाने जाणवते. प्रत्यक्ष भरणाऱ्या शाळेचे टाइमटेबल थोडेफार बदलून ऑनलाइन स्वरूपात राबवण्याचा शाळांचा अट्टहास अनाठायी वाटतो. मुलांना सुपर कम्प्युटर बनविण्याचा भारतीय पालकांचा अट्टहासही याला बऱ्याच प्रमाणात कारणीभूत आहे.
“आम्ही पालकांकडून पूर्ण फी घेणार आहोत आणि त्यासाठी ठोस कारण देताना मुलांच्या शिक्षणात आम्ही कोणताही खंड पडू देत नाही आहोत” असा आटोकाट प्रयत्न शाळा करीत आहेत; पण शाळाचालक आणि पालकांच्या या गोंधळाचा परिणाम मुलांवर होत आहे. ऑनलाइन शाळेचे वेळापत्रक त्यांना झेपत नाही. कोरोनाची साथ ओसरल्यानंतर जाड भिंगाचे चष्मे घातलेली मुले सर्वत्र दिसू लागतील. स्क्रीनसमोर दिवसभर बसल्याने मेंदूच्या संवेदना बधिर होत आहेत. प्रत्यक्ष जगात येणारे अनुभव आणि व्हर्च्युअल जगातले अनुभवविश्व यांची सरमिसळ होत आहे. घरात कोंडून राहिलेली मुले ऑनलाइन शिक्षणाचे सरासरी पाच तास आणि मोबाइल मनोरंजनाचे चार तास मिळून नऊ दहा तास मुले व्हर्च्युअल जगात वावरत आहेत. लहान मुलांच्या शिक्षणाचे स्वरूप आणि मोठ्या शाळकरी मुलांच्या शिक्षणाचे स्वरूप वेगळे असणे आवश्यक आहे.
लहान मुलांना रोज पाच विषयांचे शिक्षण देण्याऐवजी एका दिवशी एकाच विषयाची माहिती, त्याच विषयी त्यांच्याशी गप्पा, त्याच विषयाची एखादी फिल्म आणि त्याच विषयावर एखादा कला प्रकल्प असे स्वरूप करता का येऊ नये? एक दिवस पूर्ण विज्ञानासाठी, दुसरा दिवस फक्त गणितासाठी, एखादा दिवस फक्त चित्रकलेसाठी अशा स्वरूपात शिक्षण का देता येऊ नये? असे करताना विद्यार्थ्यांना वर्गातल्या इतर विद्यार्थ्यांशी संवाद करण्याची व्यवस्था हवी. मुले शाळेत अभ्यासाला जातात; पण त्याहीपेक्षा आपल्या मित्र-मैत्रिणींना भेटायला जातात. परीक्षार्थींना विद्यार्थी बनविण्याची एक चांगली संधी आपल्या समाजाला आली आहे; पण हा फक्त शाळांचा प्रश्न आहे, असा विचार करून ती घालवू नका.