ई-विद्या प्रकल्पाला मंजुरी : दुर्गम व नक्षलप्रभावित धानोरा व कुरखेडा तालुक्यातील शाळांचा समावेशदिलीप दहेलकर - गडचिरोलीधानोरा व कुरखेडा या आदिवासीबहुल दुर्गम तालुक्यातील प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाचे धडे मिळावे, यासाठी मानव विकास मिशन अंतर्गत २०१० मध्ये ई-विद्या प्रकल्प सुरू करण्यात आला. मात्र निधी अभावी दुसऱ्या वर्षी २०११-१२ या सत्रात हा प्रकल्प बंद पडला. मात्र शासनाने आता या प्रकल्पाला मंजुरी प्रदान केली असून मानव विकास मिशन अंतर्गत २०१३-१४ या वर्षाकरिता १ कोटी २१ लक्ष रूपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक सत्रापासून दुर्गम भागातील विद्यार्थी देखील संगणक शिक्षणाचे धडे गिरविणार आहेत. शिक्षण अधिकार अधिनियमानुसार माध्यमिक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी संगणक माहिती व तंत्रज्ञान हा विषयी आवश्यक करण्यात आला. यामुळे सर्वच शाळातील इयत्ता नववी व दहावीचे विद्यार्थी संगणकीय शिक्षण घेत आहेत. प्रत्यक्ष संगणकही हाताळत आहे. मात्र प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संगणक शिक्षणाची कोणतीही सुविधा नाही. शहरी भागातील प्राथमिक शिक्षण घेणारे विद्यार्थी खासगी कॉम्युटर इन्स्टिट्युटमध्ये प्रवेश घेऊन संगणक शिक्षण घेत आहेत. हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे दुर्गम भागतील विद्यार्थी खासगी संस्थेत जाऊन संगणक शिक्षण घेऊ शकत नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या संगणक शिक्षणाच्या सोयीसाठी शासनाने गडचिरोली जिल्ह्यात ई-विद्या प्रकल्पाला मान्यता दिली. या प्रकल्पांतर्गत धानोरा तालुक्यातील ८४ व कुरखेडा तालुक्यातील १०० अशा एकूण १८४ शाळांमध्ये संगणक, प्रोजेक्टर, स्क्रीन, व्ही. सॅट, प्रिंटर, स्पीकर व टेबल, खुर्ची आदी साहित्यांचा पुरवठा करण्यात आला. २०१२-१३ या शैक्षणिक सत्रात शिक्षण विभागाच्या तपासणी अहवालानुसार एव्ही लॅबमधील इयत्ता १ ते ४ च्या शाळांमधील एकूण ९ हजार १७४ विद्यार्थ्यांनी संगणक शिक्षण घेतले. ई- विद्या प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष संगणक हाताळण्याची संधी मिळाली आहे.
१८४ शाळांमध्ये होणार आॅनलाईन शिक्षण व्यवस्था
By admin | Published: June 16, 2014 1:03 AM