पुणे : राज्यातील धरणसाठ्यात वेगाने घट होत असून, पुणे, कोकण, नागपूर आणि औरंगाबाद विभागातील पाणी पातळीत मोठी घट नोंदविण्यात आली आहे. राज्यात अवघा १४ टक्के पाणीसाठा असून, औरंगाबाद विभागातील धरणांमध्ये अवघे ३ टक्के पाणी शिल्लक आहे.
राज्यातील तापमानाचा पारा पुन्हा चाळीशीपार गेला असून, विदर्भ आणि मराठवाड्यातील कमाल तापमान तर ४२ ते ४६ अंश सेल्सिअस दरम्यान आहे. गेल्या २६ दिवसांमध्ये राज्यातील उपयुक्त साठ्यात २९० अब्ज घन फुटांवरून (टीएमसी) २०२.१३ टीएमसीपर्यंत घट झाली आहे.
जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता १ हजार ४४४ टीएमसी आहे. मंगळवार अखेरीस अमरावतीत २१.२२ टक्के, औरंगाबाद २.९२, कोकण ३४.७८, नागपूर ९.०६, नाशिक १३.७५ आणि पुणे विभागामध्ये १४.१५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी राज्यात याच कालावधीत २५.२५ टक्के पाणीसाठा होता. नागपूर विभागाचा (१२.८९ टक्के) अपवाद वगळता गेल्या वर्षी सर्वच विभागात २० टक्क्यांच्यावर पाणीसाठा होता. गेल्यावर्षी शेवटच्या टप्प्यात मान्सूनने पाठ फिरविली होती. यंदाही पावसाची सरासरी कमी असेल असा पहिला अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. जून महिन्यामध्ये हवामान विभागाचा दुसरा अंदाज जाहीर होईल. अंदमानात मान्सून दाखल झाला असून केरळात तो महिनाअखेरीस दाखल होण्याची शक्यता आहे. त्याच्या प्रवासावर पाण्याचे नियोजनही अवलंबून राहणार आहे.बहुतांश जिल्ह्यांत तापमान चाळीशीपुढे असून, विदर्भात ते ४५च्या घरात आहे. या वातावरणामध्ये पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग वाढतो. जून महिन्यात पावसाचा जोर कमी राहणार असून, सरासरीपेक्षा पर्जन्यमान कमी राहील. राज्यात १० जूनपर्यंत कमाल तापमान असेच असेल. या काळात बाष्पीभवनाचा वेगही अधिक असणार आहे. त्यानुसार उपलब्ध पाण्याचे नियोजन करावे लागेल. - जीवनप्रकाश कुलकर्णी, हवामान तज्ज्ञ.विभाग उपयुक्त २१ मे अखेरीसपाणीसाठा पाणीसाठाअमरावती १४८.०६ ३१.४१औरंगाबाद २६०.३१ ७.७२कोकण १२३.९४ ४३.१०नागपूर १६२.६७ १४.७३नाशिक २१२ २९.१४पुणे ५३७.१२ ७६एकूण १४४४.१३ २०२.१३